मुलींच्या आर्थिक उन्नतीसाठी महिला सन्मान बचत पत्र व सुकन्या समृद्धी योजना

मुलींच्या आर्थिक उन्नतीसाठी महिला सन्मान बचत पत्र व सुकन्या समृद्धी योजना

मुलीचे शिक्षण, आरोग्य, मुलीचे लग्न तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्य सुधारण्याच्या उद्देशाने पोस्टामार्फत महिला सन्मान बचत पत्र आणि सुकन्या समृद्धी योजना राबविली जात आहे. मुलीचे भविष्य सुरक्षित करण्याच्या दृष्टीने या योजना फलदायी ठरत आहेत. या योजनांच्या माध्यमातून सामाजिक व आर्थिक विकास साधण्यासही मदत होत आहे. महिला व मुलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या महिला सन्मान बचत पत्र आणि सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेऊन आर्थिक उन्नती साधता येईल.

महिला सन्मान बचत पत्र योजना

महिला सन्मान बचत पत्र योजनेअंतर्गत महिला पोस्ट ऑफिसात बचत खाते उघडू शकतात. तसेच या बचत खात्यात १ हजार रुपयांपासून ते २ लाख रुपयांपर्यंत रक्कम जमा करता येऊ शकते. महिलांनी या बचत खात्यात २ लाख रुपये जमा केल्यानंतर संबंधित महिलेला दोन वर्षांनंतर २ लाख ३२ हजार रुपये मिळतील. या योजनेच्या लाभासाठी खाते उघडण्याचा फॉर्म, केवासी दस्तऐवज (आधार  व पॅनकार्ड झेरॉक्स) या कागदपत्रांची आवश्यकता आहे. ही योजना पोस्ट ऑफिसमार्फत राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत महिलेच्या नावावर किंवा मुलीच्यावतीने तिच्या नावावर तिचे पालक बचतपत्र घेवू शकतात.

या योजनेत किमान एक हजार रुपयांपासून कमाल २ लाखापर्यंत गुंतवणूक करण्याची सोय आहे. महिला व मुलीच्या नावावर कमाल २ लाखापर्यंत किमतीही बचत पत्रे घेता येतील. पण दोन बचत पत्रांमध्ये किमान तीन महिन्यांचे अंतर असले पाहिजे. या योजनेमधील गुंतवणुकीसाठी व्याजदर ७.५ टक्के तिमाही चक्रवाढ पद्धतीने असून एका वर्षानंतर ४० टक्के रक्कम काढण्याची सोय आहे. या योजनेतून घेतलेल्या बचत पत्रांची मुदत दोन वर्षाची आहे.

महिला सन्मान बचत पत्र योजनेत १ हजार रुपये गुंतविल्यास मुदतीअंती १ हजार १६० रुपये, ५० हजाराची गुंतवणूक केल्यास मुदतीअंती  ५८ हजार ११ रुपये,  रुपये १ लाखाची गुंतवणूक केल्यास मुदतीअंती १ लाख १६ हजार २२ रुपये आणि रुपये २ लाखाची गुंतवणूक केल्यास मुदतीअंती २ लाख ३२ हजार ४४ रुपये  रक्कम मिळते.

सुकन्या समृद्धी योजना

केंद्र सरकार आणि राज्य शासनामार्फत मुली व महिलांसाठी गुंतवणुकीच्या व बचत ठेवीच्या योजना राबविल्या जातात त्यापैकी एक योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना होय. मुलीचे शिक्षण, आरोग्य, मुलीचे लग्न तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही एक अतिशय फायदेशीर बचत योजना आहे. मुलींचे आई-वडील एखाद्या राष्ट्रीयकृत बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये बचत खाते उघडून या योजनेचा लाभ घेऊ शकतात.  या योजनेतील गुंतवणुकीवर ८ टक्के व्याजदर असून चक्रवाढ दराने व्याजाची आकारणी केली जाते. मुलीच्या जन्मापासून ते १० वर्षापर्यंत मुलीचे खाते उघडता येते. खाते उघडल्यापासून १५ वर्षापर्यंत प्रत्येक वर्षी किमान २५० रुपये ते कमाल १ लाख  ५० हजाराची गुंतवणूक करता येते.  प्रत्येक महिन्याला १००० रुपये भरत गेल्यास मुदतीअंती ५ लाख ३९ हजार ४५३ इतकी रक्कम मिळते. या योजनेतील गुंतवणूकीवर आयकरातून सूट आहे. या योजनांच्या अधिक माहितीसाठी पोस्ट कार्यालयात संपर्क साधावा.

०००

  • संकलन – एकनाथ पोवार, माहिती अधिकारी, सांगली

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here