श्रीमंत पेशवे यांच्या श्रीवर्धन येथील स्मारकाचा आराखडा तयार करावा – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

श्रीमंत पेशवे यांच्या श्रीवर्धन येथील स्मारकाचा आराखडा तयार करावा – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि. 5 : श्रीवर्धन (जि. रायगड) येथील श्रीमंत पेशवे यांच्या नियोजित स्मारकासाठी सर्व परवानग्या जलदगतीने घेऊन आराखडा उत्कृष्टरितीने तयार करावा, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

            मंत्रालयातील दालनात यासंदर्भात आयोजित बैठकीत मंत्री कु. तटकरे बोलत होत्या. यावेळी धर्मादाय आयुक्त महेंद्र महाजन, मुख्याधिकारी (श्रीवर्धन) विराज लबडे, नारायण देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त प्रसाद पेंडसे, प्रतिनिधी अविनाश गोगटे, श्रेयस जोशी, लक्ष्मी नारायण देवस्थानचे प्रतिनिधी गजानन करमरकर उपस्थित होते.

                  यावेळी स्मारकाच्या जागेचा प्रश्न सोडविण्यासाठी सर्व यंत्रणांनी तातडीने मार्ग काढावा, अशी सूचना मंत्री कु. तटकरे यांनी केली. देवस्थान समितीने स्मारकासाठी जागा देण्याबाबत सकारात्मक चर्चा केली, तरीही याबाबतीत काही अडचणी असल्यास धर्मादाय आयुक्त यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन त्याप्रमाणे कार्यवाही करावी, अशा सूचना मंत्री कु. तटकरे यांनी केल्या.

             मंत्री कु. तटकरे म्हणाल्या की, नगरविकास, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागांनी स्थानिक ठिकाणी आवश्यक त्या परवानग्या विहीत वेळेत घेऊन या कामाला गती द्यावी. या ठिकाणी उभारण्यात येणारे स्मारक आपल्या इतिहासाचे साक्षीदार ठरेल असे स्मारक उभारण्यासाठी सर्वांच्या सूचना लक्षात घेऊन काम करावे. रायगड जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटक, इतिहासप्रेमी  आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारे हे स्मारक होईल, अशी अपेक्षाही यावेळी मंत्री कु. तटकरे यांनी व्यक्त केली.

*****

संध्या गरवारे/विसंअ/

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here