प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृश्य संवादाची आसेगावकरांनी घेतली अनुभूती 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृश्य संवादाची आसेगावकरांनी घेतली अनुभूती 

छत्रपती संभाजीनगर दि. ९: केंद्राच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ वंचित घटकापर्यंत पोहोचावे या उद्देशाने ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ आयोजित करण्यात आली आहे. यानिमित्ताने आपापल्या भागातील वंचित लाभार्थ्यांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी केले.  या यात्रेदरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरातील विविध राज्यातील लाभार्थ्यांशी साधलेला दुरदृष्य प्रणालीवरील संवादाचे थेट प्रसारण आसेगावकरांना प्रत्यक्ष अनुभवता आले.

आसेगाव (ता. गंगापूर) येथे आज ‘विकसित भारत संकल्प यात्रा’, रथ पोहोचला.  तेथे डॉ. भागवत कराड, आमदार प्रशांत बंब, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विकास मिना, उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.ओमप्रकाश रामावत, गटविकास अधिकारी सुहास वाकचौरे, सरपंच सविता राजगुरू, एल.जी. गायकवाड, संजय खांबायते, के.टी. जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती. डॉ.कराड  यांच्या हस्ते‘आयुष्मान भारत’ कार्डचे वितरण लाभार्थ्यांना करण्यात आले.

लोकसहभाग महत्त्वाचा

आसेगावच्या ग्रामस्थांशी संवाद साधतांना डॉ. कराड म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विकसित भारत संकल्प यात्रा’ आयोजित करण्यात आली आहे. विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवावी. लोकसहभाग हा यात्रेचा महत्त्वाचा भाग आहे. समाजातील महिला, युवक, शेतकरी यासह सर्वच घटकांपर्यंत शासनाच्या योजनांची माहिती पोहोचवावी. प्रशासकीय यंत्रणेने समर्पित भावनेने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी प्रत्येकाची साथ महत्त्वाची

प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेद्वारे शेतकऱ्यांना थेट लाभ देण्यात येतो. आरोग्याची सेवा देण्यासाठी जनतेला आयुष्मान भारत कार्डद्वारे पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार करता येतात. डीबीटीद्वारे निधी वितरण,प्रधानमंत्री आवास योजना, उज्वला गॅस योजना यासह केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत.  देशाच्या सर्वांगिण विकासासाठी  व विकसित भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येकाची साथ महत्वाची असल्याचे डॉ. कराड यांनी सांगितले.

योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी स्वयंस्फूर्तीने काम करावे- आ. बंब

आमदार प्रशांत बंब म्हणाले, आयुष्मान भारत योजनेमुळे गरजूंवर पाच लाखापर्यंतचे मोफत उपचार केले जातात. यामुळे गरीबांच्या आजारावरील खर्चात बचत होवून त्यांना दिलासा मिळतो. विकसीत भारत संकल्पपूर्तीसाठी सर्व शासकीय यंत्रणांनी योजनाचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी स्वयंस्फूर्तीने काम करावे, असे आवाहन आ. बंब यांनी केले.

जिल्हावासियांनी योजनांचा लाभ घ्यावा- डॉ. मीना

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीना म्हणाले, विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून सर्व योजनांची माहिती गावागावात पोहचण्यास मदत होईल. जिल्हयातील जास्तीत जास्त गरजू लाभार्थ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

डॉ. ओमप्रकाश रामवत यांनी संकल्प यात्रेचे जिल्ह्यातील नियोजन, यात्रेद्वारे दिले जाणारे लाभ,विविध योजनांची माहिती दिली.

कार्यक्रमस्थळी विविध विभागांच्या योजनांची माहिती  देणारे स्टॉल्स लावण्यात आले होते.या स्टॉल्सला भेटी देऊन ग्रामस्थांनी विविध योजनांचा लाभ घेतला. शेवटी उपस्थितांनी विकसित भारत संकल्प शपथ घेतली.

प्रधानमंत्र्यांच्या संवादाची घेतली आसेगावकरांनी अनुभूती

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुरदृष्य प्रणालीव्दारे केंद्र शासनाच्या विविध योजनाचा लाभ घेतलेल्या देशभरातील विविध राज्यातील लाभार्थ्यांशी संवाद साधला. योजना व योजनांचे लाभ याविषयी लाभार्थ्यांचे अनुभव जाणून घेतले. संपूर्ण देशातील नागरिक ‘विकसित भारत संकल्प यात्रे’शी जोडले गेले  आहेत. ‘विकसित भारत’ हा संकल्प सत्यात आणण्यासाठी प्रत्येक कुटुंब मनापासून प्रयत्न करत आहे. विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून योजनांची माहिती व लाभ वंचितांपर्यंत पोहोचवावे, असे आवाहनही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी केले. आसेगावकरांनी प्रधानमंत्र्यांच्या या संवादाची अनुभूती घेतली.

००००

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here