समाजाप्रति संवेदना बाळगून सामान्यांच्या जीवनात आनंद निर्माण करा – ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन

समाजाप्रति संवेदना बाळगून सामान्यांच्या जीवनात आनंद निर्माण करा – ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन

सांगली दि. ४ : स्पर्धा परीक्षेत यश मिळवून शासकीय सेवेत दाखल होत असलेल्या उमेदवारांनी समाजाप्रति संवेदना बाळगून आपल्या कर्तव्यातून सामान्य माणसाच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी सचोटीने काम करावे, असा मोलाचा सल्ला ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना दिला.

राजर्षी शाहू स्पर्धा परीक्षा प्रबोधिनी व अभ्यासिका  यांच्या वतीने आयोजित स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव प्रसंगी ते बोलत होते. इस्लामपूर येथील राजारामबापू पाटील नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमास आमदार गोपीचंद पडळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस उप अधीक्षक प्रणिल गिल्डा, माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, तहसीलदार राकेश गीते, प्रदीप उबाळे, जिल्हा बँकेचे संचालक सत्यजित देशमुख यांच्यासह मान्यवर,  स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते.

‍ यशस्वी विद्यार्थ्यांच्या यशामागे त्यांच्या आई-वडिलांचा, पालकांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या प्रती नेहमीच कृतज्ञता ठेवावी, असे सांगून ग्रामविकास मंत्री श्री. महाजन म्हणाले, आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवावी. शासन सेवा मिळाल्याने सामान्य माणसाला शासनाच्या योजनांचा लाभ ‍मिळवून देण्यासाठी आग्रही रहावे. चांगल्या कामातून वेगळी ओळख निर्माण होत असते. यासाठी आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी आपुलकीने वागून त्यांचा आधार बना, असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

श्री. महाजन म्हणाले, यापुढे विद्यार्थ्यांनी कौशल्यावर आधारीत शिक्षण, प्रशिक्षण घेवून स्वत:चा व्यवसाय उद्योग सुरू करण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे. शासन उद्योग व्यवसायाला आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देत असून याचा लाभ घेऊन यशस्वी उद्योजक बनावे. याबरोबरच तरूणांनी स्वत:ला व्यसनापासून दूर ठेवावे, असे आवाहनही त्यांनी केले.

आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून शासन सेवेत आलेल्या विद्यार्थ्यांनी शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहचवून सामान्य माणसाचे जीवन सुखकर करावे, असे आवाहन केले.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाल्या, प्रशासनात काम करताना आव्हाने पेलावी लागतात. यासाठी मानसिक स्थितीबरोबरच संयम बाळगणे तितकेच महत्त्वाचे आहे. प्रत्येकाने मिळालेल्या संधीचे सोने करून समाजाप्रति आपली संवेदना जपावी, असेही त्या म्हणाल्या.

पोलीस उप अधीक्षक प्रणिल गिल्डा यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून तरूणांनी कारणांच्या मागे न लागता कष्टाची तयारी ठेवावी, असा सल्ला  दिला.

यावेळी माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, सत्यजित देशमुख यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमात 125 हून अधिक स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव मंत्री महाजन व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here