स्वतंत्र विभागामुळे दिव्यांगांसाठीच्या शासकीय योजनांना गती – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

स्वतंत्र विभागामुळे दिव्यांगांसाठीच्या शासकीय योजनांना गती – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

       सांगली, दि. 24, (जि. मा. का.) : दिव्यांग बांधवांची विशेष काळजी घेण्यासाठी शासनाने दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून दिव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ अधिक गतीने मिळेल, असा विश्वास पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी व्यक्त केला.

दिव्यांग व्यक्तिंसाठी शासन स्तरावरून कार्यान्वित योजनांच्या जनजागृती अभियानाची सुरवात पालकमंत्री डॉ. खाडे आणि दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियानाचे अध्यक्ष व मुख्य मार्गदर्शक आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

 धनंजय गार्डन येथे आयोजित या कार्यक्रमास आमदार अरुण लाड, आमदार विक्रम सावंत, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महापालिका आयुक्त सुनील पवार, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, उपायुक्त राहुल रोकडे व स्मृती पाटील, जिल्हा समाज कल्याण अधिकारी बाळासाहेब कामत आदि उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद आणि सांगली मिरज कुपवाड शहर महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हे अभियान राबवण्यात आले.

            पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, दिव्यांग बांधवांसाठी आवश्यक सर्व सोयी सुविधा देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्यांच्यासाठीच्या स्वतंत्र विभागामुळे लक्षावधी दिव्यांगांना दिलासा मिळाला आहे. दिव्यांगांमध्ये अनेक कला गुण असतात, त्या गुणांना वाव देऊन त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही ते म्हणाले. तसेच, जिल्हा प्रशासनाने दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल त्यांनी कौतुक केले.

दिव्यांगांच्या कल्याणासाठी लवकरच सर्वसमावेशक धोरण – आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू

            शासनाने दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग सुरू करण्याचा घेतलेला निर्णय हा दिव्यांग बांधवांसाठी महत्त्वाचा आहे. दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी लवकरच सर्वसमावेशक धोरण आणले जाईल. दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग आणि नवे धोरण यामुळे दिव्यांग बांधवांच्या जीवनातील दु:ख आणि वेदना दूर करण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास या अभियानाचे अध्यक्ष आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी व्यक्त केला.

            आमदार श्री. कडू म्हणाले, दिव्यांगांचे सर्वेक्षण अधिक चांगल्या प्रकारे होईल यासाठी अधिकाऱ्यांनी संवेदनशीलतेने दक्षता घ्यावी. दिव्यांग बांधवांच्या अनेक समस्या आहेत. या समस्या दूर करून दिव्यांग बांधवांच्या जीवनात आनंद व चैतन्य निर्माण करण्यासाठी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकत्रित काम करण्याची गरज आहे. दिव्यांगांना युडीआयडी ओळखपत्र व आधार ओळखपत्र मिळेल यासाठी प्रयत्न करावेत. घरकुल योजनेमध्ये दिव्यांग लाभार्थींना प्राधान्य देऊन त्यांना त्यांचे हक्काचे घर मिळवून द्यावे, असे त्यांनी सूचित केले.

            दिव्यांगांसाठी 5 टक्के खर्च करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचे सांगून ते म्हणाले, दिव्यांग बांधवांसाठी आतापर्यंत 82 शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे दिव्यांगाना अधिक तत्परतेने लाभ मिळण्यास मदत होत आहे. स्वतःचे दुःख विसरून दिव्यांग व्यक्ती आत्मविश्वासाने जीवन जगत असतो. या दिव्यांग व्यक्तीला सर्वांनीच आधार देऊन त्याचा सन्मान केला पाहिजे, असेही आमदार श्री. कडू  म्हणाले.

            दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियानाच्या माध्यमातून दिव्यांगांच्या समस्या दूर होण्यास मदत होईल, असे  मत आमदार अरुण लाड यांनी व्यक्त केले.

            जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, जिल्ह्यात सुमारे 40 हजार दिव्यांग बांधवांची  नोंदणी झाली आहे. दिव्यांगांना सर्व योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियानाच्या माध्यमातून घरोघरी सर्वेक्षण करून दिव्यांग बांधवांची नोंदणी केली जाणार आहे. नोंदणीनंतर अशा दिव्यांगांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून दिला जाईल.  याबरोबरच जिल्ह्यात दिव्यांगाच्या तपासणीसाठी कॅम्प आयोजित करून दिव्यांगांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल, असे ते म्हणाले.

           स्वागत व प्रास्ताविक उपायुक्त स्मृती पाटील यांनी केले. दीप प्रज्वलनानंतर मिरज येथील अंध शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले.

            मान्यवरांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना प्रातिनिधीक स्वरुपात शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात आला. यावेळी आमदार बच्चू कडू यांनी दिव्यांग बांधवांशी जागेवर जावून संवाद साधला व त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली.

            कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी आणि दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here