परळीतील परिपूर्ण क्रीडासंकुल ही महत्त्वाची जबाबदारी – क्रिडामंत्री  संजय बनसोडे

परळीतील परिपूर्ण क्रीडासंकुल ही महत्त्वाची जबाबदारी – क्रिडामंत्री  संजय बनसोडे

बीड दि. 1 :  परळी येथे मंजूर करण्यात आलेले क्रीडा संकुल परिपूर्ण करणे महत्त्वाची जबाबदारी असून या क्रीडा संकुलासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी परळी येथे केले. परळी येथे होत असलेल्या राज्यस्तरीय आर्चरी (धनुर्विद्या) स्पर्धेचे उद्घाटन क्रीडा मंत्री श्री बनसोडे हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते.

मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त परळी वैजनाथ येथे प्रथमच महाराष्ट्र राज्य आर्चरी असोसिएशन, बीड जिल्हा आर्चरी असोसिएशन व बीड जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय आर्चरी (धनुर्विद्या) स्पर्धा (वरिष्ठ गट) दि. ३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर 2023  या कालावधीत होणार आहेत. या स्पर्धेचा शानदार उद्घाटन सोहळा पार पडला. याप्रसंगी क्रिडा प्रशिक्षकांना जीवनगौरव पुरस्काराने तसेच खेळाडूंनाही गौरविण्यात आले.

मंत्री श्री. बनसोडे म्हणाले, परळीत आयोजित होणाऱ्या धनुर्विद्या स्पर्धा ही राज्यभरातील धनुर्विद्या खेळाडूंसाठी एक चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे. राज्य सरकार सैदव सर्वच खेळाडूंच्या पाठीशी असल्याचे ते यावेळी म्हणाले.

महाराष्ट्र आर्चरी (धनुर्विद्या) असोसिएशनच्यावतीने या राज्यस्तरीय स्पर्धा संपन्न होणार असून परळीमध्ये होणाऱ्या या स्पर्धेतून महाराष्ट्राची नॅशनल आर्चरी टीम निवडली जाणार आहे. या स्पर्धेत राज्यभरातून सहाशे खेळाडू सहभागी झाले आहेत.  फाऊंडेशन स्कूल प्ले ग्राऊंड, परळी वैजनाथ येथे ३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर  या स्पर्धा होत आहेत. काल शनिवारी या स्पर्धेचे उद्घाटन व पुरस्कार वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत झाला.

क्रिडा व युवक कल्याण मंत्री श्री. बनसोडे  यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.  यावेळी माजी आमदार संजय दौंड, , मुख्याधिकारी परळी नगर पालिका त्रिंबक कांबळे  जिल्हा क्रीडा अधिकारी सुहासिनी देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

या सोहळ्यात परळीत क्रिडा क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या दत्ताप्पा ईटके, सुभाष नाणेकर व अमर देशमुख या क्रिडा शिक्षकांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.  श्रद्धा रवींद्र गायकवाड, ऋतुजा गर्जे, सानवी सचिन सौंदळे, सूर्या सचिन सौंदळे, शुभम मुंडे, वैष्णवी लक्ष्मण गवारे,चैतन्य चिद्रवार,मनस्वी मुंडे,आभा गणेश मुंडे,राजाराम शेळके,वैष्णवी वैजनाथ जीगे,रेहान बाबू नंबरदार,सचिन शेळके,शिवदास घुले, विशाल मुंडे, राजू घुले, शंकर नागरगोजे, नितीन स्वामी,शंकर वाकडे, नामदेव मुंडे,बालाजी फड,बालाजी मुंडे, गोविंद मुंडे,कपिल बेलापट्टे, सूर्यकांत कोहाळे,ओम मेनकुदळे, रिलस्टार साईराज केंद्रे, पत्रकार शहादत अली या परळी व परिसरातील विविध खेळाडूंनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय व विविध क्रीडास्पर्धांमध्ये नाविन्यपूर्ण यश प्राप्त केलं आहे अशा खेळाडूंचा गौरव करण्यात आला.

धनंजय मुंडे यांच्या व्हिडिओ संदेशाद्वारे शुभेच्छा

या कार्यक्रमाचे व स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते होणार होते मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे मतदारसंघात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचा मोठा सोहळा आयोजित करण्यात आल्याने व या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री. मुंडे यांना उपस्थित राहावे लागले. यामुळे परळीतील राज्यस्तरीय आर्चरी स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला ते उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र त्यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे या कार्यक्रमाप्रती आपल्या सदिच्छा व शुभेच्छा व्यक्त केल्या. परळी शहरात क्रीडा विषयक राज्यस्तरीय स्पर्धा होत असून ही मोठी उपलब्धी असल्याचे सांगून या उपक्रमात पुढाकार घेणाऱ्यांचे त्यांनी कौतुक केले. तसेच जीवनगौरव पुरस्कार प्राप्त क्रीडा शिक्षकांना व सन्मान प्राप्त परळी व परिसरातील सर्व खेळाडूंना त्यांनी शुभेच्छा दिल्या.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here