ध्वजदिन निधी संकलनाच्या माध्यमातून नागरिकांनी देशसेवेत सहभाग घ्यावा -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ध्वजदिन निधी संकलनाच्या माध्यमातून नागरिकांनी देशसेवेत सहभाग घ्यावा -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ध्वजदिन निधी संकलनासाठी मुख्यमंत्र्यांकडून एक महिन्याचे वेतन

नागपूर, दि. : ध्वजदिन निधी संकलनात नागरिकांनी अधिकाधिक योगदान देत देशसेवेत सहभाग घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. तसेच, ध्वजदिन निधी संकलनासाठी स्वत:चे एक महिन्याचे वेतन देण्याची घोषणाही मुख्यमंत्री यांनी केली.

 

रामगिरी येथे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने आयोजित केलेल्या ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा आणि जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. शिल्पा खरपकर उपस्थित होत्या.

मुख्यमंत्री म्हणाले की, ‘हम करे राष्ट्र आराधन तन से, मन से, धन से, जीवन से’ या ब्रिदाप्रमाणे प्रत्येक भारतीयांनी आपल्या देशासाठी योगदान देण्याची गरज आहे. सीमेवर सैनिक देशरक्षणासाठी अहोरात्र तैनात असतात. देशाच्या प्रगतीतही सैनिकांचे योगदान महत्त्वाचे आहे. लष्कराच्या कल्याणासाठी खारीचा वाटा उचलण्याची संधी देणारा ध्वजदिन निधी संकलनाचा उपक्रम अनेक वर्षांपासून राज्यात सुरू आहे. सैनिकांप्रती कृतज्ञभाव व्यक्त करण्यासाठी नागरिकांनी ध्वजदिन निधी संकलनात योगदान देण्यासाठी मोठ्या संख्येने पुढे येण्याचे आवाहन, मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केले.

भारत देश संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होत आहे. संरक्षण साहित्याची खरेदी करणारा देश म्हणून असलेली भारताची  ओळख आता संरक्षण साहित्याचा विक्रेता देश अशी झाली आहे. भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे नुकतेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सिंधुदुर्ग किल्यावर अनावरण करण्यात आले. जम्मू-काश्मीरमध्ये देशाच्या सीमेवर कुपवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण करण्याचे सौभाग्य आपणास लाभल्याचा उल्लेखही मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी केला. ध्वजदिन निधी संकलनात देण्यात आलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त 185 टक्के ध्वजदिन निधी संकलन केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागपूर जिल्ह्याचा स्मृतीचिन्ह देवून गौरव करण्यात आला. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी हा सन्मान स्वीकारला. ध्वजदिन निधी संकलनात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

०००

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here