ज्येष्ठ शास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

ज्येष्ठ शास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

मुंबई, दि. 28 :- भारताला अन्न-धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्यात ज्येष्ठ शास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ.  एम. एस. स्वामिनाथन यांचा सिंहाचा वाटा आहे. भारताच्या कपाळावरचा अन्न-धान्य टंचाईचा कलंक पुसून देशातील गरीब शेतकऱ्यांना संकरित बियाण्यांच्या माध्यमातून अधिक उत्पादनाचा मूलमंत्र त्यांनी दिला. त्यांच्या निधनाने देशाच्या पहिल्या हरितक्रांतीचा जनक हरपला आहे, अशा शोकभावना व्यक्त करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पद्मविभूषण डॉ.  एम. एस. स्वामिनाथन यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, डॉ. स्वामिनाथन यांनी भारतातील अल्पभूधारक, कमी उत्पन्न असलेल्या शेतकऱ्यांसाठी अधिक उत्पादन देणाऱ्या संकरित वाणांचा शोध लावला. या संकरित वाणांच्या माध्यमातून त्यांनी देशाच्या पहिल्या हरितक्रांतीत अल्पभूधारक शेतकऱ्यांना देखील सहभागी करुन घेतले. तामिळनाडूमधील तंजावर जिल्ह्यात जन्मलेल्या डॉ. स्वामीनाथन यांचा सुरुवातीपासूनचं कृषी क्षेत्राकडे  विशेष ओढा होता. त्यामुळे आयुष्यात आलेल्या अनेक संधी सोडून कृषी क्षेत्रातील मूलभूत संशोधनात त्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले. बटाटा, गहू, तांदूळ आणि तागावर संशोधन करुन अधिक उत्पादन देणाऱ्या संकरित वाणांचा त्यांनी शोध लावला. केवळ संकरित वाणांची निर्मिती करून ते थांबले नाहीत तर सामान्य शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत त्यांनी संशोधन पोहोचवले.  देशाच्या पहिल्या ‘हरितक्रांती’ कार्यक्रमात त्यांनी देशातील अल्पभूधारक गरीब शेतकऱ्यालाही जोडले. या हरितक्रांतीने भारताला जगातील अन्नटंचाई असलेला देश या कलंकातून मुक्तता मिळाली. त्यांचे निधन ही भारतीय कृषी क्षेत्राची मोठी हानी आहे. देशाच्या पहिल्या हरितक्रांतीच्या प्रणेत्याला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” अशा शब्दात  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. स्वामिनाथन यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

**

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here