मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दिवाळीच्या शुभेच्छा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दिवाळीच्या शुभेच्छा

मुंबई, दि. ११ : आपल्या महाराष्ट्राच्या सर्वस्पर्शी विकासाचे स्वप्न साकार व्हावे यासाठी आणि जगाने गौरवपूर्ण वाटचालीची दखल घ्यावी यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करूया, असा निर्धार व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

दीपोत्सवाचं हे पर्व सर्वांच्या आयुष्यात मांगल्य आणि समृद्धी घेऊन येवो. सर्वांच्या आशा-आकांक्षा आणि संकल्प पूर्ण व्हावेत अशी मनोकामना, देखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.

शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, आपल्या महाराष्ट्रावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाचं छत्र आहे. त्यांनी राज्यकारभार, सामाजिक सुधारणांचा आणि जनकल्याणाचा आदर्श, धडा घालून दिला आहे. त्या प्रकाशवाटेवरूनच आपण वाटचाल करत आहोत. या वाटचालीत आम्ही राज्याच्या विकासाला गती लाभेल, आपल्या नागरिकांचे जीवनमान उंचावेल असे अनेक निर्णय घेतले आहेत. ज्येष्ठांपासून ते शाळकरी मुलांपर्यंत, माता-भगिनी, शेतकरी, कामगार आणि कष्टकरी यांच्या जीवनात या विकासाचं प्रतिबिंब उमटेल असे प्रयत्न केले आहेत, असेही त्यांनी नमूद केले आहे.

मुख्यमंत्री पुढे म्हणतात, ‘आपण महाराष्ट्राच्या सर्वस्पर्शी विकासाचे स्वप्न पाहिले आहे. महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास हा आमचा ध्यास आहे. शिवछत्रपतींचा, जिजाऊ माँसाहेब यांचा हा महाराष्ट्र केवळ देशातील अन्य राज्यांसाठी नव्हे, तर जगाने दखल घ्यावी अशी गौरवपूर्ण वाटचाल करत राहील, असे आमचे प्रयत्न आहेत. या प्रयत्नात महाराष्ट्र कुठेही मागे राहणार नाही, त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू, असे अभिवनचही यानिमित्ताने देतो.’

‘राज्यातील जनतेच्या आयुष्यात आनंद यावा, त्यांची स्वप्ने साकार व्हावीत म्हणून आपले सरकार लोकांच्या हितासाठी प्रामाणिकपणे काम करते आहे आणि पुढे देखील करीत राहील, असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले आहे की, ‘दिवाळी आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आनंद आणि चैतन्य घेऊन येते. आपण त्याच उत्साहानं हा प्रकाशाचा उत्सव साजरा करूया. आपण निसर्गपूजक आहोत. आपले सण देखील तोच संदेश देतात. म्हणूनच स्वच्छतेचा कटाक्ष बाळगूया, प्रदूषण टाळूया. सणांचा आनंद घेतांना पर्यावरणाची काळजी घेण्याची जबाबदारी सुद्धा आपली सगळ्यांची आहे हे लक्षात ठेवून सण साजरा करूया.’

०००००

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here