प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी जिंकले जग : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी जिंकले जग : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. १० : जी – २० शिखर परिषदेच्या निमित्ताने जगभरातील देशांचे प्रमुख, राष्ट्राध्यक्ष भारतात एकाचवेळी एकाच व्यासपीठावर आले. यातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जग जिंकले अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. नवी दिल्ली येथे झालेल्या या ऐतिहासिक शिखर परिषदेत सहभागी होता आले ही अभिमानाची बाब असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताचा गतीने विकास होत आहे. देशाची अर्थव्यवस्था दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आली. भारत महासत्तेकडे वाटचाल करीत असल्याचा अनुभव कालच्या शिखर परिषदेतील भारावलेले वातावरण पाहून आल्याची भावना देखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

भारतात एकाच वेळी अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी या युरोपियन तसेच आफ्रिकन देशांचे राष्ट्राध्यक्ष सहभागी झाले होते, ही उल्लेखनीय बाब आहे, ही  कामगिरी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामुळे शक्य झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

या शिखर परिषदेत प्रधानमंत्र्यांनी मांडलेला न्यू दिल्ली जी -२० लीडर्स समिट डिक्लरेशनवर एकमत झाले. जी – २० समूहाने उत्स्फूर्तपणे स्वागत केले. हे आपले मोठे राजनैतिक यश आहे. स्वच्छ इंधनाच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी भारताने जी २० शिखर परिषदेत ‘ग्लोबल बायोफ्युएल अलायन्स’ची घोषणा केली आहे. त्याचा वापर वाढला, तर जगाचे पारंपारिक इंधन पेट्रोल आणि डिझेलवरील अवलंबित्व कमी होईल आणि पर्यावरणाचे प्रदूषणही कमी होईल. याच परिषदेत ‘इंडिया-मिडल ईस्ट-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर’ (IMEC) सुरू करण्याची घोषणा करण्यात आली हे ऐतिहासिक आणि गेमचेंजर पाऊल असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

या इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या माध्यमातून आशियापासून मध्य पूर्व आणि युरोपपर्यंतचा व्यापार अधिक सुलभ होईल. आपल्या देशाच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल आणि तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याचे भारताचा स्वप्न लवकरच साकार होईल, असेही श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

या शिखर परिषदेमध्ये झालेल्या चर्चा, भारताने दिलेला “वसुधैव कुटुंबकम्ब्”चा संदेश म्हणजेच सबका साथ सबका प्रयास याला संपूर्ण जगाने पाठींबा दिला असून आता आफ्रिकन देश देखील जी- २० मध्ये समाविष्ट झाले आहेत. एकंदरीतच प्रधानमंत्री मोदी यांच्याकडे विश्वनेता म्हणून पाहिले जात आहे, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

००००

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here