‘पोलीस दादाहा सेतू’ मुळे जनता व शासन-प्रशासनात सुसंवाद वाढीस लागेल – डॉ. विजयकुमार गावित

‘पोलीस दादाहा सेतू’ मुळे जनता व शासन-प्रशासनात सुसंवाद वाढीस लागेल – डॉ. विजयकुमार गावित

दिनांक १० सप्टेंबर २०२३ (जिमाका वृत्त) : नंदुरबार जिल्हा आपल्या निर्मितीचे रौप्य महोत्सवी वर्ष साजरा करतो आहे, त्यामुळे अनेक बाबींचे सिंहावलोकन करत असताना जिल्हा विकासाकडे झेपावत असला तरी अनेक वैयक्तिक लाभाच्या कामांसाठी नागरिकांना आजही जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी पायपीट करत यावे लागते. परंतु ‘पोलीस दादाहा सेतू’ मुळे लोकांची होणारी पायपीट थांबणार असून जनता व शासन-प्रशासनात सुसंवाद वाढीस लागणार आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.

ते आज अक्कलकुवा येथे जिल्हा पोलीस दलाच्यावतीने आयोजित ‘पोलीस दादाहा सेतू’च्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अति. जिल्हा पकिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, पोलीस निरीक्षक दिपक बुधवंत व परिसरातील नागरिक, पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

या जिल्ह्यातील दुर्गम भागात अनेक नाविण्यपूर्ण उपक्रम अशक्यप्राय वाटत असतात, परंतु अशक्य ते उपक्रम शक्य करून दाखवले तर जनता अशा उपक्रमांना चांगला प्रतिसाद देत असते. नंदुरबार सारख्या आदिवासी दुर्गम, सीमावर्ती क्षेत्रात नागरिकांचे प्रश्न जटील आहेत. इथला प्रत्येक क्षण एक समस्या घेवून येत असतो, अशा परिस्थितीत या समस्यांच्या दु:खाला फुंकर घालण्याचे काम जिल्हा पोलीस दलाने या उपक्रमातून केले आहे, त्याबद्दल त्यांचे आभार मानताना पालकमंत्री डॉ. गावित म्हणाले, गेल्या पंचवीस वर्षात इथल्या जनतेने अनेक चढउतार अनुभवले आहेत. थोडे मागे वळून पाहिले तर अजूनही बराच प्रवास करायचा बाकी आहे. जनतेला समाधान वाटेल अशा कामांची पूर्तता करणे गरजेचे आहे. येणाऱ्या काळात या भागातील दळणवळण बळकट करताना ‘भगवान बिरसा मुंडा’ योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गाव, घरांपर्यंत रस्ता पोहचवला जाणार असून त्यासाठी १६ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. जलजीवन मिशनच्या माध्यमातून घराघरात प्रत्येकाला पाणी पोहचवले जाणार आहे. दूरसंचार आणि इंटरनेटचे जाळे विस्तारित करण्यासाठी जिल्ह्यात १५० टॉवर्स उभारण्यात आले आहेत. प्रत्येक ग्रामपंचायत आणि सरकारी कार्यालयांना सार्वजनिक उपयोगासाठी या सुविधा मोफत दिल्या जाणार आहेत. परिणामी या भागात शिक्षण, व्यापार, आरोग्यसेवा विस्तारताना दिसत आहेत. अशाच प्रकारे या भागात विद्युत पुरवठा सक्षम करण्यासाठी सुरवाडे आणि नवापूर येथे १३२ केव्ही क्षमतेचे विद्युत फिडर मंजूर करण्यात आले आहेत.

पालकमंत्री पुढे म्हणाले, आज एखादा सार्वजनिक कार्यक्रम अक्कलकुवा येथे घेण्यासाठी चांगले बंदिस्त ठिकाण नाही, ही उणीव येत्या वर्षभरात येथे सास्कृतिक भवनाची निर्मिती करून भरून काढली जाईल. पोलीस दादाहा सेतू च्या माध्यमातून केवळ दाखले, कागपत्र, प्रमाणपत्रच मिळणार नसून शासकीय योजनांबद्दल जनजागृतीही त्या निमित्ताने होणार आहे. कुठल्याही शुल्काविना ही कागदपत्र, प्रमाणपत्र आपल्याला मिळणार आहेत. विविध आजारांनी ग्रस्त नागरिकांना शासनाकडून अनुदान दिले जाते, त्यासाठीची रूग्णसेवाही या सेतू केंद्राच्या माध्यमातून होणार आहे. येत्या काही महिन्यात जिल्ह्यातील १०० टक्के नागरिकांना आधार कार्ड, बॅंक खाते, उत्पन्नाचा दाखला देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही यावेळी पालकमंत्री डॉ. गावित यांनी यावेळी सांगितले.

सकारात्मक वातावरण निर्मितीसाठी ‘सोशल पोलिसिंग’: पी.आर. पाटील

यावेळी मनोगत व्यक्त करताना जिल्हा पोलीस अधिक्षक पी. आर. पाटील म्हणाले की, गुन्हेगारी जगताला नियंत्रणात आणताना पोलिसांबद्दल एक प्रकारचे दहशतीचे व नकारात्मक वातावरण समाजात निर्माण झालेले दिसून येते. हे वातावरण सकारात्मकतेत बदलण्यासाठी जिल्हा पोलीस दालाने गेल्या वर्षभरात अनेक ‘सोशल पोलिसिंग’चे उपक्रम राबवले. त्यात ऑपरेश दक्षता च्या माध्यमातून ४० बालविवाह रोखले, अंमली पदार्थ मुक्त जिल्हा होण्यासाठी विशेष प्रयत्न केले. गणेशोत्सव व सण, उत्सवाच्या वेळी नागरिकांच्या मदतीने सामाजिक सलोखा राखण्यात यश मिळवले. तसेच श्रमदान, वृक्षलागवड यासारख्या उपक्रमाच्या माध्यमातून पोलीस हे समाजाचे मित्र असल्याची भावना निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला गेला. ‘पोलीस दादाहा’ हा उपक्रम असाच एक नागरिक आणि शासन-प्रशासनात संवादाचा सेतू बनून काम करण्याचा उपक्रम आहे. अक्कलकुवा सारख्या दुर्गम भागातील नागरिकांना जिल्हा मुख्यालयी विविध दाखले व दैनंदिन उपयोगी दस्तावेज तयार करण्यासाठी जावे लागते. अशा परिस्थितीत वारंवार हेलपाटे मारणे, त्याच पाठपुरावा करण्याऐवजी एखाद्या एजंटच्या भूलथापांना नागरिक बळी पडून त्यांचे आर्थिक शोषण होण्याची शक्यता असते. हे शोषण थांबविण्यासाठी हा उपक्रम राबवला जात असून पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून या सेतू केंद्रातून घरपोच व कुठलेही शुल्क न घेता दाखले व कागदपत्रे पोहचवली जाणार आहेत.

असा आहे ‘पोलिस दादाहा सेतू’ उपक्रम

जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी विविध सामाजिक कार्यक्रमात जातात, तेव्हा त्यांना अनेक सामान्य नागरिक भेटून त्यांच्या समस्या मांडत असतात. विविध शासकीय योजनांचे लाभ किंवा शासकीय योजनांची माहिती तसेच शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन एकाच ठिकाणी मिळावे, यासाठी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी ‘पोलीस दादाहा सेतू’ हा समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचे निश्चित केले असून त्याची सुरुवात प्रथम अक्कलकुवा पोलीस ठाणे येथून झाली आहे. या ठिकाणी नागरिकांचे शासकीय काम पोलीस दलामार्फत शासकीय कार्यालयात पोहचवून झालेली कामे, दाखले, प्रमाणपत्रे आदी नागरिकांना परत मिळणार आहेत.

नागरिक व शासकीय कार्यालये यामध्ये सेतूची भूमिका पार पाडण्याच्या संकल्पनेतून या योजनेचे ‘पोलीस दादाहा सेतू’ असे नामकरण केले आहे. बऱ्याचदा आदिवासी बांधवांना वेगवेगळ्या शासकीय किंवा निमशासकीय कामांसाठी आवश्यक असणारे शासकीय कागदपत्रे काढण्यासाठी जिल्हा किंवा तालुक्याच्या ठिकाणी विविध कार्यालयात जावे लागत असते. अशा वेळी तेथे गेल्यानंतर त्यांना आवश्यक असणारे कागदपत्रे कुठे मिळतात, कुणाकडे अर्ज करावा, त्यासाठी लागणारे कागदपत्र कोणते,किती दिवसात मिळतील, त्याची प्रक्रिया काय, याबाबत माहिती नसल्यामुळे किंवा अशिक्षितपणा अथवा अज्ञानामुळे कागदपत्रे काढण्यासाठी अडचणी येतात. या शासकीय कामासाठी एजंटकडून फी घेतली जाते. यात वेळ व पैसा यांचा अपव्यय होतो. या सर्व बाबींचा विचार करुन नंदुरबार जिल्हा दलातर्फे पोलीस दादाहा सेतू हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. सर्व कामे विनामुल्य होणार आहेत. पोलीस दादाहा सेतू या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये एक स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात येणार असून संबंधीतांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात येईल. या उपक्रमाची सुरुवात पोलीस दलातर्फे अक्कलकुवा पोलीस ठाण्यापासून करण्यात येत आहे.

‘पोलीस दादाहा सेतू’ पहिल्याच दिवशी या दाखल्यांचे झाले वितरण

🗞️उत्पन्नाचा दाखले ०५

🗞️अधिवास व राष्ट्रीयत्व दाखला ०४

🗞️३३ % महिला आरक्षण प्रमाणपत्र ०१

🗞️चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रे १७

🗞️जातीचे दाखले ०८

🗞️ रेशन कार्ड ०४

🗞️आभा (ABHA) कार्ड ३८

🗞️ एकुण ७७

००००००००००

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here