नंदुरबारला साकारणार आंतरराष्ट्रीय दर्जाची आदिवासी क्रीडा प्रबोधिनी – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबारला साकारणार आंतरराष्ट्रीय दर्जाची आदिवासी क्रीडा प्रबोधिनी – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार: दिनांक ९ सप्टेंबर २०२३ (जिमाका वृत्त) आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये खेळाचे गुण उपजत असतात. त्यांना जर योग्य संधी व सुविधा मिळाल्या तर ते क्रीडाक्षेत्रात देशाचे नाव जागतिक स्तरावर गाजवू शकतात, हे आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक आदिवासी खेळाडूंनी दाखवून दिले आहे. त्यामुळे नंदुरबार येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण करणारी आदिवासी क्रीडा प्रबोधिनी साकारण्याचा विचार असून, त्यात आदिवासी खेळाडूंना सांघिकसोबत वैयक्तिक क्रीडा प्रकाराचे धडे दिले जातील, अशी माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली आहे.

ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्ह्यातील सर्व तालुका क्रिडा संकुलांच्या निर्मिती संदर्भात आयोजित आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील,तहसीलदार नितीन गर्जे, नंदुरबार नगरपालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी नितीन कापडणीस, जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, तालुका क्रिडा अधिकारी व जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री डॉ. गावित म्हणाले, आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये उत्तम कलागुण, बौद्धिक क्षमता आहे. या मुलांच्या क्रीडा गुणांना चालना देणे व क्रीडाविषयक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी विकास विभागाकडून राज्यातील पहिली आदिवासी क्रीडा प्रबोधिनी नाशिकमध्ये सुरू करण्यात आली आहे. त्या धर्तीवर ती नंदुरबारमध्ये सुरू करण्याची बाब  विचाराधीन आहे. त्यात पाचवी च्या वर्गापासून प्रवेश दिला  जाईल. त्यात ८० टक्के आदिवासी व २० टक्के इतर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये  प्रचंड ऊर्जा व काटकता असते, धावणे, पोहणे, लांब, उंच उडी आणि नेमबाजीसह विविध क्रीडा प्रकारांचे कौशल्य नैसर्गिकरीत्या असते. सांघिक प्रकाराबरोबरच वैयक्तिक क्रीडा प्रकारात पदके मिळविण्याची संधी जास्त असल्याने या आदिवासी क्रीडा प्रबोधिनीत सामुहिक क्रीडा प्रकारांसोबत कनो-कायाकिंग, नेमबाजी, जिम्नॅस्टिक्स, कुस्ती, धनुर्विद्या, बॉक्सिंग, स्विमिंग या वैयक्तिक खेळांचाही समावेश असेल. या वैयक्तिक क्रीडा प्रकारात खेळानुसार स्वतंत्र प्रशिक्षकाची नियुक्ती सोबतच त्यांच्या दर्जेदार व पोषक आहारावरही विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. तसेच क्रीडा प्रबोधिनी परिसरात वसतिगृहाच्या सुविधा असणार आहेत. तसेच या खेळाडू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसह शाळेत जाण्या-येण्यासाठी वाहन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे. वैयक्तिक तसेच सांघिक खेळांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडांगणांमध्ये अद्ययावत क्रीडा साहित्याद्वारे उत्तम दर्जाच्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सराव करता येणार असल्याचेही डॉ गावित यांनी यावेळी सांगितले.

ते म्हणाले, प्रत्येक तालुक्यातील क्रिडा संकुलांच्या निर्मितीसाठी  येणाऱ्या सर्व अडचणींचे निराकरण करून त्यांचे बांधकाम वर्षभरात पूर्ण करण्यासाठी नियोजन करावे. धडगाव, अक्कलकुवा, तळोदा  क्रिडा संकुलांच्या प्रस्तावित जागेसंदर्भात तहसीलदार व संबंधित मुख्याधिकाऱ्यांनी  आठ दिवसाच्या आत अहवाल सादर करावा. तसेच नंदुरबार, नवापूर, शहादा येथील तालुका क्रिडा संकुलांच्या जागेचा प्रश्न मार्गी लागला असल्याने त्यांचे आराखडे तयार करून तात्काळ कामे सुरू करण्यात यावीत. नंदुरबार क्रिडा संकुलाकडे जाणारा रस्ता अरूंद असल्याने तो रूंद करण्यासाठी नंदुरबार-खामगाव रस्ता तातडीने प्रस्तावित करावा. शहादा क्रिडा संकुलात ४०० मीटरचा ट्रॅक तयार करण्यासाठी नियोजित रचनेचा आराखडा तयार करावा. नंदुरबार क्रिडा संकुलाचे आजूबाजूला असलेल्या  सर्व व्यापाऱ्यांना क्रिडा संकुलातच गाळे देण्यात येणार असून त्याबाबत सर्व व्यापाऱ्यांशी करार केला जाईल. ज्यांना अधिकचे गाळे पाहिजे असतील त्यांना  लिलावात सहभागी होवून ते घेता येतील, असेही यावेळी पालकमंत्री डॉ.गावित यांनी सांगितले.

यावेळी पालकमंत्री डॉ. गावित यांनी नंदुरबारसह सर्व तालुका क्रिडा संकुलांचा नियोजित रचनात्मक आराखड्याची पाहणी करून सूचना केल्या.  तसेच नंदुरबार क्रिडा संकुलाच्या आजूबाजूला असलेल्या व्यापारी बांधवांशी सकारात्मक चर्चा केली.

०००००

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here