कलाग्राम प्रकल्पाची कामे जलदगतीने पूर्ण करावीत : मंत्री छगन भुजबळ

कलाग्राम प्रकल्पाची कामे जलदगतीने पूर्ण करावीत : मंत्री छगन भुजबळ

नाशिक, दिनांक: 9 सप्टेंबर, 2023 (जिमाका वृत्त): कलाग्राम प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी 5 कोटी रूपयांचा निधी मंजूर झालेला असून हे कलाग्राम लवकरच सुरू करण्याच्या दृष्टीने येथील उर्वरित कामे जलदगतीने पूर्ण करावीत, अशा सूचना राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

गोवर्धन येथे दिल्ली हटच्या धर्तीवर साकारत असलेल्या कलाग्राम प्रकल्पाची मंत्री भुजबळ यांनी आज पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी जगदीश चव्हाण, अभियंता महेश बागुल, पर्यटन विभागाचे उप अभियंता ज्ञानेश्वर पवार, गोवर्धन गावचे सरपंच बाळासाहेब लांबे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

 मंत्री छगन भुजबळ यावेळी म्हणाले, कलाग्राम प्रकल्पाचे काम हे त्वरीत पुर्ण करण्यात यावे. सद्यस्थितीत येथे बांधण्यात आलेल्या दुकानांचे अंतर्गत व बाह्य विद्युतीकरण करणे, पथदिवे बसविणे त्याचप्रमाणे दुकानांना शटर, दरवाजे, खिडक्या बसविण्याची कामे सुरू करण्यात यावीत. कलाग्राम येथील अंतर्गत रस्ते, ड्रेनेज व्यवस्था, उपहागृह व प्रसाधन गृह येथे आवश्यक असलेली प्लंबिंगची कामे, वाहनतळ पार्कींग व्यवस्था ही कामे दर्जात्मक झाली पाहिजे. त्याचप्रमाणे कलाग्रामच्या बाह्य बाजुस बाग-बगिचा व परिसर सुशोभिकरण करणे यासोबतच लहान मुलांसाठी खेळणी पार्क तयार करण्याच्या सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी भुजबळ यांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या गंगापूर मेगा पर्यटन संकुलातील कन्व्हेन्शन सेंटर आणि अंजनेरी येथील ट्रेकिंग इन्स्टिट्यूटच्या कामांचाही आढावा घेतला. बोटक्लब नाशिक येथे 1 हजार अतिथी बसण्याची व्यवस्था होईल असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कन्व्हेंशन सेंटर बांधण्यात येत असून यात पहिल्या टप्प्यात 600 अतिथी बसण्याची व्यवस्था होईल असा 1 हॉल, 200 अतिथी बसण्याची व्यवस्था होईल असे 2 हॉल, ऍप्मीथिअटर, उपहारगृह, प्रसाधान गृह, केंद्रीकृत वातुनूकुलित यंत्र, प्रोजेक्टर वीथ साउंड सिस्टीम ही कामे पूर्ण झाली असल्याची माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी जगदीश चव्हाण यांनी दिली. तसेच दुसऱ्या टप्प्यातील मंजूर झालेल्या 2 कोटी 20 लाख

निधीतून अंतर्गत फर्निचर व सजावट, वाहनतळाची व्यवस्था बाह्य बाजूस बाग-बगीचा व सुशोभिकरण करणे, पथ दिवे आणि अंतर्गत रस्ते यांची कामे त्वरीत पूर्ण करण्याच्या सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.तसेच अंजनेरी येथील ट्रेकिंग इन्स्टिट्यूट सूरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याबाबत भुजबळ यांनी निर्देश दिले.

00000000

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here