मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी ‘सखी निवास’ करिता प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी ‘सखी निवास’ करिता प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

मुंबई दि.९ : जिल्ह्यातील नोकरी करणाऱ्या महिलांना नोकरीच्या ठिकाणी राहत असलेल्या शहरात सुरक्षित आणि सोयीस्कर निवासाची व्यवस्था होण्यासाठी केंद्र शासनामार्फत ‘सखी निवास’ ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतंर्गत मुंबई उपनगर येथे सहा सखी निवास भाडेतत्वावरील इमारतीमध्ये कार्यान्वित करण्यात येणार आहेत. या योजनेसाठी केंद्र शासनाने निश्चीत केलेल्या संस्था तसेच एजन्सीजकडून  दिनांक १८ सप्टेंबर, २०२३ रोजी कार्यालयीन वेळेपर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नोकरी करणाऱ्या महिलांना नोकरीच्या ठिकाणी सुरक्षित आणि सोयीस्कर पध्दतीने निवासाच्या व्यवस्थेकरिता केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार मिशन शक्ती अंतर्गत ‘संबल’ आणि ‘सामर्थ्य’ या दोन योजना राबविण्यात येत आहेत. सदर योजनेतील ‘सामर्थ्य’ या उपयोजनेत नोकरी करणाऱ्या महिलांकरीता ‘सखी निवास’ या घटक योजनेचा समावेश आहे. मुंबई उपनगर या जिल्ह्यात सध्या कार्यरत असलेल्या नोकरी करणाऱ्या महिलांच्या वसतिगृहांव्यतिरिक्त आणखी नविन ०६ सखी निवास कार्यान्वित करावयाची आहेत.

या योजनेंतर्गतचे प्रस्ताव सादर करण्यासाठी आवश्यक असलेली सविस्तर माहिती केंद्र शासनाचे दि. १४ जुलै २०२२ रोजी ‘मिशन शक्ती’ या योजनेच्या मार्गदर्शक सुचना, प्रस्ताव सादर करावयाच्या अर्जाचा नमुना, अर्ज सादर करण्याची सर्वसाधारण पध्दत, संस्था एजन्सीच्या पात्रतेचे निकष, सखी निवासासाठी आवश्यक असलेली इमारत व भौतिक सोयीसुविधा,अनुदान, कर्मचारी वर्ग, शासन निर्णय इ. सर्व सविस्तर माहिती आयुक्त, महिला व बाल विकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या https://www.wcdcommpune.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

मुंबई उपनगर जिल्ह्यात केंद्र शासन पुरस्कृत ‘सखी निवास’ योजना कार्यान्वित करुन ती केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना व राज्य शासनाचे शासन निर्णय व या संबंधीचे वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या सुचनेनुसार सदरची योजना राबविण्यास इच्छुक असलेल्या संस्था  तसेच एजन्सीकडून याद्वारे दि.१८ सप्टेंबर, २०२३ रोजी कार्यालयीन वेळेपर्यंत प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.

तरी याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय मुंबई उपनगर प्रशासकीय इमारत १ ला मजला, दुसरा टप्पा, आर. सी मार्ग, चेंबूर, मुंबई -७१, दूरध्वनी: ०२२-२५२३२३०८ येथे संपर्क करावा असे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बी. एस. नागरगोजे यांनी केले आहे.

 

******

 

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here