दोन वर्षांच्या अमित संजय भोयर याची निर्घृण हत्या करण्यात आली. अमितची आई पूजा संजय भोईर (२५) हिने पोलिसात तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी ३२ वर्षीय आरोपी दीपक उर्फ बाळ्या भोईर याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार महिला पूजा आणि संजय यांचे ५-६ वर्षांपूर्वी लग्न झाले असून त्यांना तीन मुले आहेत. संजयसोबत वारंवार भांडण होत असल्याने पूजा मुलगा अमितसह आईच्या घरी राहायला गेली होती.
यावेळी आरोपी दीपक भोईर हा पूजाच्या माहेरी गेला. त्याने तिच्यावर आपले प्रेम व्यक्त केले. चांगल्या प्रकारे आयुष्य व्यतीत करण्याची खात्री देत त्यांनी पूजाला पोहराबंदीत आणले.
दरम्यानच्या काळात दीपक अमितवरुन पूजासोबत भांडायला लागला. एप्रिलमध्ये त्याने दोघांना मारहाण केली. यामुळे पूजाने दीपकविरुद्ध फ्रेजरपुरा पोलिसांत मारहाणीची तक्रार दाखल केली होती. ती अमितसोबत तिच्या आईच्या घरी परतली.
ऑगस्टमध्ये अमितची तब्येत बिघडल्याने पूजाने त्याला येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले. यावेळी दीपकने पूजाला पुन्हा आपल्यासोबत पोहराबंदी येथे राहायला येण्याची विनवणी केली.
मंगळवारी दीपक कामावरून घरी परतला. त्याने पूजासोबत पुन्हा भांडण उकरुन काढलं, तिला शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर दीपकने अमितला पाळण्याबाहेर फेकलं आणि त्याच्यावर कोयत्याने वार केला, त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
दीपकने पूजाला कुणालाही न सांगण्याची धमकी दिली. मात्र पोलीस पाटील आणि ग्रामस्थांनी फ्रेजरपुरा पोलिसांना माहिती दिली, त्यांनी पूजा आणि दीपकची चौकशी केल्यानंतर गुन्हा उघडकीस आला.