मुंबई, दि. ६ : शाळांमध्ये परसबागा निर्माण करून त्यात उत्पादित भाजीपाला व इतर पदार्थांचा समावेश शालेय पोषण आहारामध्ये करण्याचे निर्देश केंद्र शासनाच्या ‘प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण’ योजनेंतर्गत देण्यात आले आहेत. या अनुषंगाने राज्यात उत्कृष्ट परसबागा तयार होण्यासाठी आणि या उपक्रमास प्रोत्साहन देण्यासाठी उत्कृष्ट परसबाग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर आयोजित करण्यात येणार असून विविध निकषांच्या आधारे परसबागांचे 100 गुणांमध्ये मूल्यांकन करण्यात येणार आहे. उत्कृष्ट परसबागांना तालुका स्तरावर प्रथम क्रमांकासाठी पाच हजार रूपयांचे, जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांकासाठी दहा हजार रूपयांचे तर राज्य स्तरावर प्रथम क्रमांकासाठी 51 हजार रूपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त प्रत्येक स्तरावर द्वितीय, तृतीय आणि प्रोत्साहनपर बक्षिसेही देण्यात येणार आहेत.
परसबाग निर्मितीमुळे विद्यार्थ्यांची निसर्गाशी जवळीक निर्माण होऊन त्यांना नवनिर्मितीचा आनंद मिळणे, ताज्या भाजीपाल्याचा समावेश पोषण आहारात होऊन विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार उपलब्ध होणे असे विविध चांगले हेतू साध्य होत आहेत. परसबाग उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी सन 2022-23 या शैक्षणिक वर्षामध्ये शासनाने उत्कृष्ट परसबाग स्पर्धा आयोजित केली होती. त्याचा परिणाम म्हणून राज्यामधील सुमारे 22 हजार 973 शाळांमध्ये परसबाग निर्माण झाल्या आहेत. हा प्रतिसाद पाहता चालू शैक्षणिक वर्षामध्ये राज्यातील सर्व शाळांमध्ये परसबागा निर्माण करण्याचे उद्दिष्ट शासनाने निर्धारित केले आहे.
०००
बी.सी.झंवर/विसंअ/