येरवडा आणि हवेली येथील औद्योगिक संस्थांना उपयुक्त व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करावेत – उपमुख्यमंत्री अजित पवार

येरवडा आणि हवेली येथील औद्योगिक संस्थांना उपयुक्त व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करावेत – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. ६ :- पुण्यातील येरवडा येथे मान्यता देण्यात आलेल्या नवीन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि हवेली येथील शासकीय औद्योगिक संस्थांना जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येईल. पुणे येथील औद्योगिक संस्थांना उपयुक्त ठरणारे व्यावसायिक अभ्यासक्रम औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये सुरू करावेत, अशी सूचना उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यानी दिली.

मंत्रालय येथे आयोजित कौशल्य विकास विभागाच्या आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री श्री. पवार बोलत होते.

या बैठकीला कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता  विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार सुनील टिंगरे, कौशल्य, रोजगार, उद्योजकता विभागाचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते, व्यवसाय व शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी, मुख्य अभियंता अतुल चव्हाण उपस्थित होते

उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले की, येरवडा येथील नवीन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या कामासंदर्भात सुनियोजित आराखडा तयार करावा. विद्यार्थ्यांना आयटीआयमधील पारंपरिक अभ्यासक्रम शिकवण्यापेक्षा आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित व स्थानिक गरजा विचारात घेऊन ‘इंडस्ट्री फोर झिरो’ अंतर्गत रोबोटिक्स, सीएनएस मशीन हॅण्डलिंग, मेकॅनिक्स हे अभ्यासक्रम या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये सुरू करण्याबाबत सर्व मान्यता घेण्यात याव्यात व त्याप्रमाणे कार्यवाही करावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने निधी प्राप्त होताच तत्काळ या कामांना गती द्यावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केल्या.

0000

संध्या गरवारे/विसंअ

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here