धरणांमध्ये उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करा – मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील

धरणांमध्ये उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करा – मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील

जळगाव दि. ४ सप्टेंबर (जिमाका):-* गत वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. या परिस्थितीत उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापराबरोबरच उपलब्ध संसाधनांचा प्रभावीपणे वापर करावा. जिल्ह्यातील २६ महसूल मंडळात पावसाने २१ दिवसांपेक्षा जास्त खंड दिला आहे. अशा गावांमध्ये पाणी, चारा उपलब्धतेचा आढावा घेऊन मदत उपलब्ध करून द्यावी. असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी आज येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई  आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी मदत व पुनर्वसन मंत्री श्री पाटील बोलत होते.

यावेळी खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेष पाटील, आमदार किशोर पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, अपर जिल्हाधिकारी प्रविण महाजन , निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, आपत्ती व्यवस्थापन सल्लागार डॉ.प्रशांत वाघमारे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरसिंह रावळ तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील म्हणाले की, अवकाळी व अतिवृष्टीच्या पावसामुळे अद्याप मदत न मिळालेल्या २०२०-२१ पासूनच्या प्रलंबित मदतीचा आढावा घेण्यात येऊन मदतीपासून वंचित शेतकऱ्यांना मदत निधी वितरित करण्यात यावा. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. याची दक्षता घेण्यात यावी.

जनतेला दिलासा देण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अधिक संवेदनशीलपणे काम करावे. जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये उपलब्ध असलेल्या पाण्याचे पिण्यासाठी व सिंचनासाठीच्या वापराचे काटेकोरपणे नियोजन करण्यात  यावे. पाण्याचा अपव्यय होणार नाही यादृष्टीने काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

पाऊस कमी झाला असल्यामुळे गावातून टँकरद्वारे पाणी पुरवठयाच्या मागण्या प्राप्त होतील. ज्या ज्या गावातून टँकरद्वारे पाणी पुरवठ्याची मागणी येईल. अशा ठिकाणी टँकर मंजूर करत पाणी पुरवठ्याला प्राधान्य देण्यात यावे. गावामध्ये पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक ठरविण्यात यावे. पाणी  पुरवठ्यामध्ये नागरिकांची तक्रार येणार नाही. याची काळजी घेण्याचे निर्देशही श्री पाटील यांनी यावेळी दिले.

जिल्ह्यांमधील विविध आपत्तीमुळे होणारी जिवित व वित्त हानी टाळण्यासाठी ज्या आपत्तीचे सौम्यीकरण करायचे आहे. अशा आपत्ती सौम्यीकरणाचे प्रस्ताव तात्काळ तयार करण्यात यावेत. अशा सूचना ही श्री पाटील यांनी यावेळी विविध शासकीय विभाग प्रमुखांना दिल्या.

या बैठकीत पोलीस, जिल्हा परिषद, महानगरपालिका, अधीक्षक अभियंता, महावितरण, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण,  जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळ, जिल्हा शल्यचिकीत्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद ग्रामीण विकास विभाग, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

००००००००

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here