सदनिकेची संपूर्ण रक्कम घेऊनही शहरातील अनेक बिल्डर सध्या गृहप्रकल्प वेळेत पूर्ण करीत नाहीत. त्यामुळे नवीन घर घेण्याची स्वप्ने उराशी बाळगणाऱ्या ग्राहकांना मात्र घरासाठी प्रतीक्षाच करावी लागते. अनेकदा बिल्डरकडे हेलपाटे मारूनही त्यांना पदरी निराशा येते, असे अनुभव घर घेऊ इच्छिणाऱ्यांपैकी अनेकांना आले असतील; परंतु त्या तक्रारींची सर्वच बिल्डर दखल घेतात असे नाही. अशा वेळी ग्राहकांना ‘महारेरा’कडे धाव घ्यावी लागते. अशा तक्रारींची दखल घेऊन बिल्डरने त्यांना नुकसाभरपाई द्यावी, असे आदेशही ‘महारेरा’ने यापूर्वीच्या प्रकरणात दिले आहेत.
‘महारेरा’च्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावणाऱ्या बिल्डरांविरोधात ‘महारेरा’ने जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने संबंधित बिल्डरांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले होते. या तक्रारींची दखल घेऊन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी संबंधित तालुक्यांच्या तहसीलदारांना कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार तहसीलदारांनी ३६ तक्रारी निकाली काढल्या आहेत. त्यातून ३० कोटी ७१ लाख रुपयांची वसुली जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
तीन प्रकरणे न्यायप्रविष्ट
एकूण तक्रारींपैकी तीन प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. त्यातील एक प्रकरण पुणे शहरातील असून, त्यात सात कोटी २३ लाख रुपयांची वसुली आहे. दोन प्रकरणे मुळशी तालुक्यातील आहेत. त्यातून एक कोटी ३७८ लाख रुपयांची वसुली करावी लागणार आहे. न्यायप्रविष्ट प्रकरणात फारशी कारवाई करण्यात आली नाही; परंतु त्यात योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
सर्वाधिक तक्रारी हवेलीतून
‘महारेरा’ने संबंधित बिल्डरांविरोधात वॉरंट जारी केले होते. जिल्ह्यात अशा बिल्डरांविरोधात १७६ तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यानुसार ग्राहकांचे १५३ कोटी १९ लाख रुपये बिल्डरांकडे अडकून पडले होते. त्यात सर्वाधिक ७८ तक्रारी हवेली तालुक्यातील आहेत. त्यामध्ये पुणे शहरातून २६ आणि पिंपरी -चिंचवड शहरातून ३२ तक्रारी आल्या आहेत, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
बिल्डरांविरोधातील ग्राहकांच्या तक्रारींची दखल घेऊन आतापर्यंत ३६ तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. निकाली काढलेल्या तक्रारींमध्ये हवेली आणि पिंपरी-चिंचवड येथील प्रत्येकी दहा तक्रारींचा समावेश आहे. त्या तक्रारींच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाने ३० कोटी ७१ लाख रुपयांची वसुली केली आहे.
– डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी
तालुकानिहाय निकाली काढलेल्या प्रकरणांची स्थिती
तालुका……… प्रकरणे ………..निकाली प्रकरणे………. वसूल रक्कम (कोटींत)
हवेली …………७८ …………..१०………………२.४९
पुणे शहर …………२६…………….९……….२५.५६
पिंपरी चिंचवड ………..३२………..१०………..०.८१
मावळ ……………..९………१………….०.५१
मुळशी …………..११…………….०…………०.०
खेड …………६………….२……………०.५३
शिरूर ………… ५………….०……….००
बारामती ……………४………….३………०.६५
दौंड ………….३…………१………..०.१६
पुरंदर ………..२………………०………..०