तत्कालीन खासदार डॉ. संजीव नाईक यांनी २०१२मध्ये दिघा स्थानकाची मागणी केली होती. सन २०२३मध्ये स्थानकाचे काम पूर्ण झाले. ज्या परिसरामध्ये हे स्थानक निर्माण झाले आहे, त्या परिसरातील सर्व नागरिकांची या स्थानकाला दिघा स्थानक नामकरण करण्याची मागणी होती. मात्र, रेल्वे प्रशासनाने या स्थानकाचे नाव मार्च २०२३च्या अधिसूचनेमध्ये दिघा ऐवजी दिघे असे ठेवले होते.
आमदार गणेश नाईक यांनी या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विषय उपस्थित केला होता. त्यानंतर राज्य सरकारने दिघा स्थानक नामकरणाचा प्रस्ताव मंजूर करून अंतिम मंजुरीसाठी तो केंद्रीय गृह विभाग, रेल्वे मंत्रालय, रेल्वे बोर्डाकडे पाठवला आहे. या रेल्वे स्थानकातील त्रुटी दूर करून येत्या काही दिवसांमध्ये दिघा रेल्वे स्थानक प्रवाशांच्या सेवेत रुजू होईल, असा विश्वास डॉ. संजीव नाईक यांनी व्यक्त केला. दिघा येथील लाखो रहिवाशांसाठी या स्थानकाच्या नामकरणाचा विषय त्यांच्या अस्मितेचा विषय होता. त्यामुळे या स्थानकाचे दिघा स्थानक असे नामकरण झाल्याचे समजताच येथील लाखो नागरिकांनी आनंद व्यक्त केला.