सरसकट ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली अंबड व गेवराई तालुक्यातील १२३ गावांनी मंगळवारी आंदोलन केले होते. या आंदोलनावेळी राज्य सरकारने ठोस आश्वासन दिले नव्हते. त्या कारणास्तव जरांगे यांनी आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले होते. जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी शुक्रवारी शेकडो समर्थकांनी गर्दी केली. वाढलेली, गर्दी पाहून तसेच आंदोलकांच्या तब्येतीची स्थिती लक्षात घेता त्यांच्याशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याची विनंती पोलिसांनी केली मात्र, आंदोलकांनी नकार दिल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला. लाठीमारात अनेक आंदोलक जबर जखमी झाले.
शरद पवार जालन्याच्या अंबडला जाणार
महाराष्ट्रात सध्या फक्त आणि फक्त हुकूमशाही चालू आहे. राज्य सरकार आणि गृह खात्यावर राज्यात शांतता प्रस्थापित करण्याचे काम असते, परंतु गृहमंत्रालयातील प्रशासकांनी पोलिस बळाचा वापर करून मराठा आंदोलकांवर तीव्र लाठीचार्ज केलेला आहे. हि अतिशय संतापजनक बाब आहे. जालन्यात झालेल्या ह्या अमानवीय घटनेला राज्याचे गृहमंत्रालय जबाबदार असून मी या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करतो, अशी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करतानाच शरद पवार आज जालन्याच्या अंबडमध्ये जाऊन आंदोलनकर्त्यांना धीर देणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत आमदार रोहित पवार आणि माजी मंत्री राजेश टोपेही असतील.
पोलीस बळाचा गैरवापर झालाय, त्यांच्यावर कारवाई होणारच : अजित पवार
जालना जिल्ह्यातील अंबड येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीमार, रबरी गोळ्यांचा आणि बळाचा गैरवापर झाल्याचं प्रथम दर्शनी दिसत आहे. याप्रकरणी पोलिसांच्या भूमिकेची सखोल, निष्पक्ष चौकशी करण्यात येईल आणि दोषी पोलिसांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील नागरिकांना दिला.
दरम्यान, लाठीमाराचे तीव्र पडसाद उमटून धुळे-सोलापूर महामार्गावर एसटी बसवर दगडफेक करण्यात आली आणि काही बसला आग लावण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ आज, शनिवारी बीड जिल्ह्यात बंद पुकारण्यात आला आहे.