वाढवण बंदर प्रकल्प रोजगार वृद्धीसह स्थानिकांच्या विकासासाठी पूरक- पालकमंत्री रवींद्र चव्हाण

वाढवण बंदर प्रकल्प रोजगार वृद्धीसह स्थानिकांच्या विकासासाठी पूरक- पालकमंत्री रवींद्र चव्हाण

मुंबई, दि. २३ : वाढवण बंदर प्रकल्प हा फक्त राज्याच्या नव्हे, तर देशाच्या विकासाच्यादृष्टीने महत्त्वाचा व हिताचा तसेच रोजगार वृद्धी करणारा प्रकल्प आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या उभारणीसाठी सर्वांनी समन्वयाने सकारात्मकरित्या मार्ग काढला पाहिजे. पालघर जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन हा प्रकल्प यशस्व‍िरित्या पूर्णत्वास नेला पाहिजे. वाढवण बंदर प्रकल्पाचा जास्तीत जास्त फायदा हा भूमिपुत्र व स्थानिकांनाच मिळेल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज सांगितले.

वाढवण बंदर प्रकल्पासंदर्भात चर्चा करण्यासाठी मंत्रालयात पालघर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची बैठक मंत्री श्री. चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. या बैठकीला खासदार राजेंद्र गावित, आमदार निरंजन डावखरे, आमदार राजेश पाटील, आमदार विनोद निकोले, आमदार श्रीनिवास वनगा, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितिज ठाकूर व आमदार सुनील भुसारा हे दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते. यावेळी पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जवाहरलाल नेहरु प्राधिकरणाचे अध्यक्ष संजय सेठी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

वाढवण बंदर प्रकल्पाच्या अनुषंगाने येत्या २२ डिसेंबर २०२३ रोजी जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे. या जनसुनावणी पूर्वी आजच्या सादरीकरणाचा अभ्यास करुन एक बैठक आयोजित करण्यात येईल, असे मंत्री श्री. चव्हाण यांनी सांगितले. हा प्रकल्प फक्त राज्याच्या नाही, तर देशाच्या हिताचा व विकासासाठी महत्त्वपूर्ण आहे. या प्रकल्पामुळे पालघर जिल्ह्यातील भूमिपुत्रांना रोजगाराचे साधन उपलब्ध होणार आहे. स्थानिकांनाही या प्रकल्पाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. येथील एकही प्रकल्पबाधित विस्थापित होणार नाही व त्यांचे योग्य पध्दतीने पुनर्वसन करण्यात येईल, असे मंत्री श्री. चव्हाण यांनी सांगितले.

या बैठकीत जवाहरलाल नेहरु प्राधिकारणाच्या माध्यमातून करण्यात आलेले सादरीकरण पालघर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना देण्यात आले आहे. या सादरीकरणाच्या अनुषंगाने कोणाच्या काही शंका वा काही प्रश्न असतील, तर त्यांचे निराकारण करण्यात येईल. तेथील नागरिकांवर कोणत्याही प्रकारे अन्याय होणार नाही याची काळजी शासनाच्यावतीने घेण्यात येईल. प्रकल्पाबाबत कोणाचे काही प्रश्न असतील तर ते समजावून घेण्यात येतील व त्यामधून सकारात्मकरित्या मार्ग काढण्यात येईल, असेही मंत्री श्री. चव्हाण यांनी सांगितले.

यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनी आपले म्हणणे मंत्री श्री. चव्हाण यांच्यासमोर मांडले.  प्राधिकारणाचे अध्यक्ष श्री. सेठी यांनी वाढवण बंदर प्रकल्पाचे सादरीकण केले. या सादरीकरणाच्या माध्यमातून प्रकल्पाचा आराखडा, मूळ उद्देश, भविष्यात प्रकल्प उभारणीचे टप्पे, बंदर उभारणीसाठी केलेला अभ्यास आदी सर्व बाबींची माहिती देण्यात आली.

००००

वंदना थोरात/विसंअ/

 

 

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here