नंदुरबारचा बहुसांस्कृतिक चेहरा ‘आदिवासी सांस्कृतिक भवन’च्या माध्यमातून जगासमोर येणार – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबारचा बहुसांस्कृतिक चेहरा ‘आदिवासी सांस्कृतिक भवन’च्या माध्यमातून जगासमोर येणार – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार : दिनांक ३० ऑगस्ट २०२३ (जिमाका वृत्त) राज्यातील पहिला आदिवासी बहुल जिल्हा म्हणून नंदूरबारची निर्मिती आजच्या २५ वर्षांपूर्वी झाली. जिल्ह्याचा रौप्य महोत्सव साजरा करताना नंदुरबारचा बहुसांस्कृतिक चेहरा आदिवासी सांस्कृतिक भवनाच्या निर्मितीतून जगासमोर येणार असून, वीर एकलव्य आणि भगवान बिरसा मुंडा यांची स्मारके नंदुरबार शहरात उभारणार असल्याने प्रशासनाने आठ दिवसात त्याबाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचना आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात आदिवासी सांस्कृतिक भवन निर्मिती, वीर एकलव्य, भगवान बिरसा मुंडा यांच्या स्मारक निर्मितीच्या आढावा बैठकीत पालकमंत्री डॉ.गावित बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित, जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.सावन कुमार,अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज, प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार, परीविक्षाधिन सनदी  अधिकारी अंजली शर्मा, तहसीलदार नितीन गर्जे व विविध कार्यान्वयीन यंत्रणांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री डॉ. गावित म्हणाले, राज्यातील आदिवासी समाजाची कला, संस्कृती, वेशभूषा, परंपरा जतन करण्यासाठी नागपूर व नाशिक येथे संग्रहालय उभारण्यात येणार असून सध्या त्यांचा प्रारूप आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. राज्यातील वेगवेगळ्या आदिवासी जमातीच्या कला संस्कृतीची ओळख जगाला या संग्रहालयाच्या माध्यमातून होईल. नंदुरबारसह आठ आदिवासी बहुल जिल्ह्यात आधुनिक सांस्कृतिक भवन बांधण्यात येणार आहे. तसेच गेल्यावर्षी राज्यात नाशिक येथे राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यंदा हा महोत्सव जिल्ह्याच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त नंदुरबार येथे नोव्हेंबर मध्ये भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त घेण्याचा विचार आहे.  या महोत्सवातून आदिवासी पारंपारिक खाद्य महोत्सव, आदिवासी पारंपारिक नृत्यस्पर्धा, आदिवासी लघुपट तसेच माहितीपट महोत्सव, राज्यस्तरीय आदिवासी पारंपारिक हस्तकला प्रदर्शन व विक्री अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. आदिवासी बांधवांच्या उत्थानासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना असून या योजना तळागाळातल्या आदिवासी बांधवांपर्यंत अशा प्रकारच्या सांस्कृतिक महोत्सवातून पोहचविण्याचे काम शासनामार्फत केले जात असल्याचेही यावेळी पालकमंत्री डॉ. गावित यांनी सांगितले.

पालकमंत्री म्हणाले, येत्या आठ दिवसात सांस्कृतिक भवन व स्मारक उभारणी बाबत योग्य ती कार्यवाही करून माहिती सादर करावी.  जागेची मोजणी व उबलब्धता याबाबतची माहिती सादर करावी. तसेच जिल्ह्यात विविध ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या सांस्कृतिक भवन/ संकुल यांची तपशीलवार माहिती  घेवून स्मारक उभारण्यासाठी सर्व कायदेशीर व नियमानुसार असलेल्या बाबींची पूर्तता करून तशी कारवाई करण्याच्या सूचना पालकमंत्री यांनी यावेळी प्रशासनास दिल्या आहेत.

यावेळी झालेल्या चर्चेत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित व जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांच्यासह उपस्थित अधिकारी यांनी सहभाग घेतला.

००००००००००

 

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here