गणेश विसर्जन- ईद ए मिलाद एकाच दिवशी, नगरमध्ये मुस्लिम समाजाने असा काढला तोडगा

गणेश विसर्जन- ईद ए मिलाद एकाच दिवशी, नगरमध्ये मुस्लिम समाजाने असा काढला तोडगा

अहमदनगर : गेल्या काही काळापासून अहमदनगर शहरातील सामजिक वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर यावर्षी एकाच दिवशी आलेले गणेश विसर्जन आणि ईद ए मिलाद हे उत्सव कसे साजरे होणार, याचा पेच निर्माण झाला होता. विशेष म्हणजे अहमदनगरमध्ये या दोन्ही मिवरणुकांची वेळ आणि मार्गही एकच असतो. अशा परिस्थितीत ईद उत्सव समितीच्या पुढाकाराने हा पेच सुटला आहे. ईद त्याच दिवशी घरात साजरी करायची आणि मिरवणूक गणेश विसर्जनानंतर १ ऑक्टोबरला काढायची असा निर्णय उत्सव समिती आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे मोठा प्रश्न सुटला असून पोलिस प्रशासनानेही समाधान व्यक्त केले आहे.

यावर्षी २८ सप्टेंबरला गणेश विसर्जन आहे. त्याच दिवशी ईद ए मिलाद (मोहम्मद पैगंबर जयंती) आहे. दोन्ही मिरवणुका एकाच दिवशी एकाचवेळी निघल्याने पेच निर्माण होऊ नये, यासाठी तख्ती दरवाजा ईद उत्सव समिती तसेच मोहरम उत्सव समिती यांच्या पुढाकारातून तख्ती दरवाजा येथे बैठक झाली. बैठकीला शहराचे पोलिस उपअधीक्षक अनिल कातकडे, ईद उत्सव समितीचे शेख अब्दुल कादीर, मोहरम समितीचे करीम हुंडेकरी, खलील सय्यद उपस्थित होते. ईद त्याच दिवशी म्हणजे २८ सप्टेंबरलाच घरोघरी आणि मशिदींमध्ये साजरी करायची. मिरवणूक मात्र रविवारी १ ऑक्टोबरला नेहमीच्या मार्गावरून काढायची, असा निर्णय यावेळी घेण्यात आला. याबद्दल पोलिसांतर्फे कातकडे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद दिले. असाच समजूतदारपणा राज्यातील इतर ठिकाणीही दाखविला जावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

गेल्या काही काळापासून नगर शहरातील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न होत आहे, या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजानेच पुढाकार घेऊन हा सामंजस्याचा निर्णय घेतल्याचे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

हुंडेकरी म्हणाले, की दोन्ही सण-उत्सव दोन्ही धर्माच्या लोकांसाठी महत्वाचे आहेत. त्यासोबतच शहरातील सलोखाही सर्वांसाठी महत्वाचा आहे. त्यामुळे आम्ही स्वत: होऊन पुढाकार घेऊन यासंबंधी चर्चा केली. धार्मिक क्षेत्रातील व्यक्तींचे मार्गदर्शन घेतले आणि हा तोडगा काढला. ईदच्या दिवशी मुस्मिम समाज नेहमीप्रमाणे घरी आणि मशिदीत ईद साजरी करेल. मात्र, त्यादिवशी गणपती विसर्जन मिरवणूक असल्याने ईदची मिरवणूक काढली जाणार नाही. ती मिरवणूक त्यानंतर येणाऱ्या रविवारी म्हणजे १ ऑक्टोबरला काढण्यात येईल. आमचा हा निर्णय आम्ही पोलिसांना कळविला आहे. सर्व समाजाने यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन हुंडेकरी आणि शेख अब्दुल कादीर यांनी केले आहे. खलील सय्यद यांनी सांगितले की, हा निर्णय मुस्लिम समाजाने स्वत: पुढाकार घेत घेतला आहे. त्यासाठी पोलिस प्रशासन किंवा राजकीय दबाव अजिताबत नव्हता. विघ्नसंतोषी मंडळींकडून वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न केला जातो, तो हाणून पाडण्याचा हा प्रयत्न आहे, असेही खलील सय्यद यांनी सांगितले.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here