मुंबई, दि. 29 : गणेश मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या अधिनस्त पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीतर्फे सन २०२२ पासून उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा सुरु करण्यात आली. यावर्षी आयोजित उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत जास्तीत जास्त गणेशमंडळांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
या स्पर्धेची माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या संकेतस्थळावर देण्यात यावी. तसेच राज्यातील नागरिकांना घरबसल्या राज्यातील विविध गणेश मंडळाच्या गणपतींचे दर्शन व त्यांच्या सजावटीचा आनंद घेता यावा यासाठी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अर्ज करणाऱ्या गणेश मंडळाची छायाचित्रे संकेतस्थळावर प्रसिद्ध करावीत, अशा सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिल्या.
मंत्रालयातील समिती सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मंत्री श्री. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, उपसचिव विद्या वाघमारे, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे संचालक संतोष रोकडे, उपसंचालक विद्यारत्न काकडे, माहिती व जनसंपर्कचे उपसंचालक (वृत्त) दयानंद कांबळे, अवर सचिव सु.वि.पासी उपस्थित होते.
मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, यावर्षी सहभागी होणाऱ्या गणेशोत्सव मंडळांची सविस्तर माहिती, गणेशोत्सव सुरू झाला त्या संदर्भातील माहिती, गणेशाची पूजा-अर्चना यासंदर्भात माहिती देण्यासाठी आकाशवाणीवर 30 मिनिटांचा विशेष कार्यक्रम करण्यात यावा.
स्पर्धेत पुरस्कार प्राप्त गणेश मंडळांना मुंबईतील सिद्धिविनायकाच्या दर्शनाचे पासेस देण्यात यावेत. गिरगावमध्ये पहिला गणेशोत्सव आयोजित करणाऱ्या व्यक्तीचा, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा सत्कार करण्यात यावा. गणेश मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, नगर परिषद मुख्याधिकारी यांना सूचना देण्यात याव्यात. तसेच स्पर्धेची सर्व माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी करावी, असेही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.
उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचे वेळापत्रक असे
उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गणेश मंडळांना 15 सप्टेंबर 2023 पर्यंत स्पर्धेत अर्ज करता येईल. mahotsav.plda.@gmail.com या ई – मेलवर गणेशमंडळांनी अर्ज करावा. पु. ल. देशपांडे कला अकादमी तर्फे ई-मेलवर प्राप्त अर्ज संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाला १८ सप्टेंबर पर्यंत परीक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात येईल. १९ ते २८ सप्टेंबर दरम्यान जिल्हास्तरीय समितीचे सदस्य स्पर्धेत सहभागी गणेशोत्सव मंडळाचे प्रत्यक्ष भेटी देऊन परीक्षण करतील. व्हिडिओग्राफी आणि कागदपत्रे तपासून अभिप्रायासह गुणांकन करतील. जिल्हास्तरीय समिती जिल्ह्यातून एका उत्कृष्ट गणेश मंडळाची शिफारस १ ऑक्टोबरपर्यंत पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीला करतील. राज्यस्तरीय समिती राज्यातील उत्कृष्ट ३ गणेश मंडळाची शिफारस पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीला करतील. त्यानुसार कला अकादमी विजेत्या मंडळाची घोषणा करुन १२ ऑक्टोबरला विजेत्या गणेश मंडळाला पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
गणेशमंडळांना देण्यात येणाऱ्या पुरस्काराचे स्वरुप
राज्यातील पहिल्या तीन विजेत्या गणेशमंडळांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे, त्या पुरस्काराचे स्वरूप असे आहे. यामध्ये प्रथम पुरस्कार ५ लक्ष रुपये व प्रमाणपत्र, द्वितीय पुरस्कार २ लक्ष ५० हजार रुपये व प्रमाणपत्र , तृतीय पुरस्कार १ लक्ष रुपये व प्रमाणपत्र तसेच जिल्ह्यातील एका उत्कृष्ट गणेश मंडळाला २५ हजार रुपये व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल.
००००
मनीषा सावळे/विसंअ/