मुंबई दि २७ – शहरातील हरित उद्याने तयार करण्यात नागरिकांचाही मोठा सहभाग आहे. लवकरच कोळीवाडा मच्छिमार क्षेत्र, चर्चगेट, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, गेट वे ऑफ इंडिया येथे आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पर्यटनाच्या दृष्टीने विकास करणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी सांगितले.
कुलाबा, कफ परेड येथे सुरक्षा उद्यानाचे लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्यात अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर बोलत होते.
अध्यक्ष ॲड् नार्वेकर म्हणाले की, उद्यानाचे लोकार्पण नागरिक आणि येथील रहिवाशी संघाचे यश आहे. या क्षेत्रात रहिवाशांच्या तुलनेत कामानिमित्त विविध कार्यालय आणि संस्थांमध्ये असलेली लोकसंख्या जास्त आहे. या परिसरात हरित उद्यानाबरोबरच लवकरच नव-नवीन बदल घडणार आहेत. परिसर स्वच्छ व दुरूस्ती देखभालीमध्ये सातत्य राखणे नागरिकांचे कर्तव्य आहे.
मुंबईतील हरित क्षेत्रात वाढ करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई शहरात राहण्यासाठी सुयोग्य आणि शाश्वत विकासाचा बदल घडवून आणणार आहे. शहरात हरित क्षेत्रात वाढ करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.
या वर्ष अखेरीस शहराच्या सागर तटीय मार्गाचा काही भाग नागरिकांना प्रवासासाठी सुरू करण्यात येणार असून, कफ परेड ते विरारचा प्रवास सुकर आणि कमी वेळात होणार आहे. ट्रान्स हार्बर आयकॉनिक ब्रिजमुळे मुंबई आणि नवी मुंबई शहरे जोडली जाणार आहेत. तसेच तेथून नवी मुंबई विमानतळासाठी दूसरा सागरी मार्ग तयार करण्यात येणार आहे. समुद्रात सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यावर प्रकिया करण्यासाठी मानके तयार करण्यात आले आहेत. लवकरच १०० टक्के प्रक्रिया केलेले पाणीच समुद्रात सोडले जाईल. तसेच भरती आली की शहरात साचलेले पाणी भुमार्गातून समुद्रात जाण्यासाठी जपानच्या सहायाने यंत्रणा तयार करण्यात येणार आहे
यावेळी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पुर्व उपनगरे) अश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू , अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त ( पश्चिम उपनगरे) सुधाकर शिंदे, नगरसेवक हर्षिता नार्वेकर, मकरंद नार्वेकर , कफ परेड रहिवाशी संघाचे प्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित होते.
०००