पाण्यापासून वंचित क्षेत्राला पाणी देण्यास शासन कटिबध्द – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

पाण्यापासून वंचित क्षेत्राला पाणी देण्यास शासन कटिबध्द – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली दि. 26 (जि.मा.का.):-  पाण्यापासून वंचित असलेल्या क्षेत्राला पाणी देण्यासाठी शासन कटिबध्द आहे, असे प्रतिपादन कामगार मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले.

मिरज तालुक्यातील टाकळी येथील माधव मोहिते मळा येथे आयोजित पाणी परिषद शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता श्री. पाटोळे, कार्यकारी अभियंता रोहीत कोरे, मकरंद देशपांडे, काकासाहेब धामणे, टाकळी गावच्या सरपंच हिना नदाफ यांच्यासह पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, मिरज तालुक्यातील 7  धडक उपसा सिंचन योजना म्हैसाळ उपसा सिंचन योजनेत समाविष्ट करून टाकळी, मालगाव परिसरातील पाण्यापासून वंचित असलेल्या क्षेत्राला पाणी देण्यासाठी शासन स्तरावर प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. याबाबत शासनस्तरावर पाठपुरावा सुरू असून लवकरच हा प्रस्ताव  मार्गी लावू. शासनस्तरावरून मंजूरी प्राप्त झाल्यानंतर पाण्यापासून वंचित असलेल्या क्षेत्राचे तात्काळ सर्व्हेक्षण करून त्याचे अंदाजपत्रक सादर करावे. त्यानुसार शासन स्तरावरून आवश्यक कामासाठी निधीची मागणी करता येईल.

समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे  पिण्याच्या पाण्यासाठी  टँकरच्या मागण्या होवू लागल्या आहेत. टंचाईच्या ठिकाणी पिण्यासाठी पाणी देण्यासाठी तयारी केलेली आहे. शेतकऱ्यांनी चिंता करू नये. शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे पालकमंत्री डॉ. खाडे यांनी यावेळी सांगितले.

अधिक्षक अभियंता श्री. पाटोळे यांनी टाकळी, मालगाव भागातील वंचित क्षेत्राला पाणी देण्यासाठी सादर केलेल्या प्रस्तावाबाबत सविस्तर माहिती देवून सद्यस्थितीत प्रस्ताव शासन स्तरावर असून मंजूरीसाठी आवश्यक ती सर्व पूर्तता केली जाईल, असे सांगितले.  यावेळी मकरंद देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले.

प्रास्ताविकात दयाधन सोनवणे यांनी पाणी परिषद आयोजित करण्याचा हेतू विषद करून टाकळी, मालगाव, बोलवाड भागातील पाण्यापासून वंचित असलेल्या क्षेत्राला लवकरात लवकर पाणी देण्याची मागणी केली. आभार काकासाहेब धामणे यांनी मानले.

पाणी परिषद शेतकरी मेळावा कार्यक्रमानंतर 15 लाख रूपये  किंमतीच्या प्रजिमा 56 ते मालगाव संगाप्पा पाटोळे ते सुभाष चिप्परगे वस्ती रस्ता सुधारणा कामाचे उद्घाटन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आले.

 

000000

 

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here