जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील सहकार विभागाची मंगळवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीसाठी पंजाबराव बोरसे हे सकाळी बोदवड येथून त्यांच्या एमएच १९, एसी २२४ या क्रमाकांच्या दुचाकीने जळगावला यायला निघाले होते. जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात पोहोचले त्या वेळी तेथे मागून गॅस सिलिंडर घेऊन जाणाऱ्या क्र. एमएच ०४, जेयु ९५९६ या क्रमाकांच्या ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. यात बोरसे चाकाखाली आले आणि त्यांच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला. त्यामुळे ते जागीच गतप्राण झाले. नागरिकांनी तातडीने रुग्णावाहिका मागवून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेला. बोरसे यांच्याकडे असलेल्या पिशवीतील कागदत्रांवरुन त्यांची ओळख पटली.
आजोबा होण्यापूर्वीच काळाने घातली झडप….
पंजाबराव बोरसे हे मूळचे मनूर, ता. बोदवड येथील रहिवासी असून ते सध्या बोदवड येथे राहत होते. मृत पंजाबराव बोरसे यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुली, एक मुलगा, भाऊ असा परिवार आहे. वयोवृद्ध आई आजारी असते, तर तसेच बोरसे यांची एक मुलगी प्रसूतीसाठी माहेरी आलेली आहे. बोरसे हे आजोबा होणार होते, मात्र मुलीची प्रसूती होण्यापूर्वीच त्यांच्यावर अपघाताच्या रुपाने काळाने झडप घातली. यावेळी रुग्णालयात बोरसे यांच्या कुटुंबीयांनी मोठा आक्रोश केला. बोदवड येथून जळगावला येत असताना बोरसे यांनी नशिराबाद येथून सोसायटीच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून आपण जळगावच्या जवळच असल्याचे सांगितले होते. त्यानंतर काही वेळात बोरसे यांच्या अपघातात मृत्यूची बातमी कळल्याने नागरिकांना मोठा धक्का बसला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर बैठक सोडून सर्व कर्मचारी रुग्णालयात पोहोचले. महामार्गाच्या मधोमध अपघात झाल्याने काही वेळ वाहतूक थांबली होती. मात्र पोलिसांनी काही वेळातच वाहतूक सुरळीत केली.