वाढते नागरीकरण, आयटी हब, निवासी आणि आद्योगिक संकुलांमुळे वागळे वाहतूक उपविभागात गेल्या काही वर्षांपासून कोंडीची समस्या गंभीर होत आहे. या भागात रस्त्याच्या दुतर्फा होणाऱ्या पार्किंगमुळे होणाऱ्या कोंडीचा मनस्ताप स्थानिकांना होतो. ही कोंडी फोडण्यासाठी ठाणे वाहतूक शाखेने श्रीनगर, सावरकरनगर, हाजुरी, रोड क्रमांक २८, साठे चौक, समतानगर, वर्तकनगर, गावंडबाग, यशोधननगर, आर. जे. ठाकूर महाविद्यालय, लक्ष्मी पार्क, देवदया नगर भागांत विविध रस्त्यांवर २४ तासांसाठी नो पार्किंग तर काही भागात पी १, पी २ व समांतर पार्किंगची मुभा अधिसूचनेद्वारे केली आहे.
अरुंद रस्ते, पार्किंग प्लाझाची वानवा
या भागातील रस्ते अरुंद असून पार्किंग प्लाझाची वानवा असल्याने अनेक रहिवासी रस्त्यावरच वाहने उभी करतात. त्यातच शाळा, महाविद्यालय, आयटी पार्क, कंपन्यांनी वेढलेल्या या परिसरात दररोज हजारो वाहने प्रवास करत असल्याने ही कोंडी कमी करण्यासाठी ही नवीन पार्किंग नियमावलीची चाचपणी सुरू असल्याचे ठाणे वाहतूक शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.