इथे प्रत्येक घरात आढळतो नाग; सापांना पाळीव प्राण्याचं स्थान, ग्रामस्थांच्या घरातील कोपरा राखीव

इथे प्रत्येक घरात आढळतो नाग; सापांना पाळीव प्राण्याचं स्थान, ग्रामस्थांच्या घरातील कोपरा राखीव

सोलापूर: जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात नागोबाचे शेटफळ गाव आहे. गावात हेमाडपंती नागोबा मंदिर आहे. नागोबाच्या मंदिरामुळे नागाला सन्मान प्राप्त आहे. गावातील प्रत्येक घरात कोब्रा नाग आढळतो. नागोबाच्या शेटफळ गावातील ग्रामस्थ नागाला घाबरत नसून त्याला सन्मानाने पकडून त्याची पूजा करून सन्मानाने आणि आदराने नागोबाच्या मंदिरामागे आणून सोडतात. महाराष्ट्रात या गावाला नागोबाचं गाव म्हणून प्रसिद्धी मिळाली आहे. हजारो वर्षांपासून गावात फक्त कोब्रा प्रजातीचे नाग आढळतात. हजारो वर्षांपासून नागाची पूजा केली जाते. आजतागायत एकाही ग्रामस्थाला नागाने दंश केला नाही किंवा नागाच्या दंशाने कुणाचा मृत्यू झाला नाही, अशी ग्रामस्थांनी माहिती दिली. गावातील प्रत्येक घरात नागाला पाळीव प्राण्याचे स्थान दिले आहे.

करमाळा तालुक्यातील नागोबाच्या शेटफळ गावात अनेक जुनी घरे आहेत. जुन्या काळातील दगड मातींचे वाडे आहेत. मातीचे बांधकाम करताना ग्रामस्थ आपल्या घरात नागासाठी वरच्या बाजूस विशेष माळवद करतात. मातीच्या माळवदीत गोलाकार आकाराची लाकडी बांबू लावली जातात. जेणेकरून नागाला बसण्यासाठी किंवा त्याला आराम करण्यासाठी सोय केली जाते. इथल्या प्रत्येक घरात नागाला पाळीव प्राणी म्हणून स्थान देण्यात आलेले आहे. घरातील एक कोपरा किंग कोब्रासाठी राखीव असतो. नागोबाच्या शेटफळ गावची लोकसंख्या जवळपास २६०० च्या घरात आहे. शेटफळ गावात ९ सदस्यांची ग्रामपंचायत आहे. सर्व समाजातील लोक या गावात वास्तव्यास आहेत. गावाच्या लोकसंख्येपेक्षा सापांची संख्या अधिक असल्याची माहिती ग्रामस्थ सांगतात.

नागोबाच्या पुजाऱ्याने माहिती सांगितले की, लहानपणी ३० वर्षांपूर्वी एका नागाला इजा पोहोचली होती. त्या नागाला आजही गावात फिरताना पाहतात. त्याला झालेल्या इजेची खूण आजही त्याच्या फणीवर आहे. एका ग्रामस्थाने सांगितले की, जवळपास शंभर शंभर वर्षे जुने नाग गावात आहेत. त्यांच्यापासून आम्हाला काहीही धोका नाही. शेवटी नाग एक मुका प्राणी आहे. त्याच्या जवळ न जाता त्याला एका लाकडाच्या साहाय्याने बाजूला करत आम्ही जीवन जगत आहोत. दिवसातुन दोन ते तीन ठिकाणी नाग आढळतात आणि ते माणसाळलेली आहेत.

प्रतिकात्मक नागमूर्तींच्या पूजनाने शिराळ्यात पार पडली नागपंचमी

नागपंचमी सण शेटफळ गावात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गावातील कोब्रा नाग मंदिरात आणून त्यांची विशेष पूजा केली जाते. महिला वर्ग विशेष गाण गात सापाची लांबूनच पूजा करतात. आजूबाजूच्या गावातील नागरिक देखील कोब्राला पाहण्यासाठी शेटफळ गावात नागपंचमीला दाखल होतात. एक आठवडाभर नागोबाच्या मंदिरात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करून नागाची पूजा केली जाते. इतर जिल्ह्यात नागपंचमीला सापाला धरून आणले जाते. पण इथं मात्र नाग आपोआप मंदिरात येतात. सर्व ग्रामस्थांसमोर मंदिरात फणी काढून बसतात. इतर गावात मनुष्याला पाहून नाग पळून जाण्याचा प्रयत्न करतात, पण इथं शेटफळ गावात मोठ्या गर्दीत नाग रुबाबाने गर्दीला पाहत बसतात.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here