महिला बचतगटांना व्यापाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाचे संपूर्ण पाठबळ – पालकमंत्री मंगलप्रभात लोढा

महिला बचतगटांना व्यापाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाचे संपूर्ण पाठबळ – पालकमंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई, दि. १९:   महिला बचतगटांना  त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी हक्काची जागा आणि प्रसिद्धी यासाठी संसाधने उपलब्ध नसल्याची तक्रार पालकमंत्री लोढा यांच्यासमोर मे २०२३ मध्ये जनता दरबाराच्या माध्यमातून मांडली गेली होती. त्या अनुषंगाने सर्व महिला बचतगटांना आठवडी बाजाराच्या माध्यमातून हक्काची जागा देण्याचे आणि त्यांच्या उत्पादनां ची प्रसिद्धी करण्याचे निर्देश पालकमंत्री लोढा यांनी दिले होते. त्यानुसार मुंबई महापालिकेतील २४ प्रभागांमध्ये शनिवार १९ ऑगस्टपासून आठवडी बाजार सुरू करण्यात आला आहे.

पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते  घाटकोपरमध्ये शुभारंभ

महापालिकेच्या एन विभागातर्फे सुचित्रा बिझनेस पार्क, बी. एम. सी. पार्किंग, पटेल चौक, घाटकोपर (पूर्व) येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रथम आठवडी बाजाराचा शुभारंभ पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी आमदार राम कदम उपस्थित होते.


“महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकार तत्पर असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली अशा नाविन्यपूर्ण संकल्पनांचे आयोजन नेहमीच होत राहील. जनता दरबाराच्या माध्यमातून समोर आलेल्या तक्रारींची दखल घेऊन नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध करणे हे आमचे ध्येय आहे. त्या अनुषंगाने हा आठवडी बाजार सुरू करण्यात आलेला असून ही तात्पुरती राबवली जाणारी संकल्पना नाही. या योजेनेचा कायमस्वरुपी लाभ महिला बचतगटांना मिळणार आहे. यापुढे देखील महिलांच्या आर्थिक विकासासाठी या उपक्रमांतर्गत विविध बदल करण्यात येतील”, असे पालकमंत्री लोढा यांनी सांगितले.

“आठवडी बाजारामध्ये सहभागी होण्यासाठी महिला बचतगटांना नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी केलेल्या ५० बचतगटांना महापालिकेतर्फे जागा उपलब्ध करून दिली जाईल. आठवडी बाजारात महिला बचतगटांकडून त्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे माहितीपत्रक ग्राहकांना देण्यात येईल, ज्यामुळे ग्राहक त्या वस्तू  थेट महिला बचतगटाला संपर्क करुन मागवू शकतात व त्यांचा व्यवसाय निरंतर सुरू  राहील. महापालिकेच्या माध्यमातून वस्ती-वस्तीत फलक  व स्पीकरच्या माध्यमातून आठवडी बाजाराचा प्रचार करण्यात येत आहे. सोबतच सर्व महिला बचतगटसुद्धा घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. स्थानिक व्यापारी वर्गालादेखील या उपक्रमात सहभागी करून घेऊन त्यांना महिला बचतगटांसाठी व्यापाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे”, असेही मंत्री श्री.लोढा म्हणाले.


या आठवडी बाजारांच्या माध्यमातून महिला बचतगटातील महिलांनी तयार केलेल्या वस्तूंची विक्री होऊन त्यांना आर्थिक पाठबळ मिळणार आहे.

०००

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here