बृहन्मुंबई महानगरपालिकेतील २४ विभागांत आठवडी बाजाराचे आयोजन – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील २४ विभागांत आठवडी बाजाराचे आयोजन – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, दि. १८ : बृहन्मुंबई महानगरपालिकेत २४ विभागांत मे २०२३ मध्ये झालेल्या जनता दरबारात, महिला बचतगटाकडून व्यवसाय करण्यासाठी स्टॉलची मागणी करण्यात आली होती, त्या मागणीवर  प्रत्येक वार्ड ऑफिसमध्ये आठवडी बाजाराचे नियोजन करण्याची सुचना स्थानिक प्रशासनाला केली होती. या सूचनेच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेतील २४ विभागांत आठवडी बाजाराचे आयोजन करण्यात येत आहे.त्याचा उद्घाटन सोहळा घाटकोपर पश्चिम एन वार्ड मधील सुचित्रा बिझनेस पार्क, बी. एम. सी. पार्किंग, पटेल चौक, घाटकोपर पूर्व येथे दिनांक १९ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.

मंत्री श्री.लोढा म्हणाले की, आठवडी बाजाराच्या माध्यमातून महिला बचत गटाच्या महिलांना व्यवसाय वाढीसाठी बळ मिळेल व महिला अधिक सक्षम होतील. आठवडे बाजारात महिलांनी बनविलेल्या घरगुती वस्तूंची विक्री करण्यासाठी आठवड्यातुन शनिवार आणि रविवार असे दोन दिवस त्यांना जागा देण्यात येईल. प्रत्येक आठवड्याला ५० महिला बचतगटांना व्यवसायाची संधी मिळेल. व्यवसाय वाढीसाठी व्यापारी वर्गाला विशेष निमंत्रित केले जाणार आहे. ज्यामुळे महिला बचतगटाने तयार केलेल्या वस्तूंना व्यापाऱ्यांची साथ मिळेल. आठवडी बाजारात महिला बचत गटाकडून त्यांनी बनविलेल्या वस्तूंचे माहिती पत्रक ग्राहकांना देण्यात येईल, ज्यामुळे ग्राहक त्या वस्तु थेट महिला बचत गटाला संपर्क करुन मागवू शकतात व त्यांचा व्यवसाय निरंतर चालु राहील. महानगरपालिकेच्या माध्यमातुन वस्तीवस्तीत फलक लावून व स्पीकरच्या माध्यमातून आठवडी बाजाराच्या प्रचार करण्यात येत आहे. सोबतच सर्व महिला बचत गट सुद्धा घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत.

बी. एम. सी. व शासनाच्या माध्यमातुन महिलांना आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने उचलले गेलेले हे एक महत्वपूर्ण पाउल आहे, ज्यामुळे महिलांच्या मेहनतीला शासनाची साथ मिळत आहे असेही मंत्री श्री.लोढा म्हणाले.

घाटकोपर पश्चिम  एन वार्ड मध्ये होणार उद्या आठवडी बाजाराचे उद्धघाटन

घाटकोपर पश्चिम एन वार्ड मधील सुचित्रा बिझनेस पार्क, बी. एम. सी. पार्किंग, पटेल चौक, घाटकोपर पूर्व येथे दिनांक १९ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी १२:०० वाजता कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे हस्ते आठवडी बाजाराचे उद्धघाटन होईल.

०००

संध्या गरवारे/विसंअ

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here