जरबेरा फुलशेतीने दिले आर्थिक स्थैर्य

जरबेरा फुलशेतीने दिले आर्थिक स्थैर्य

परंपरागत शेती सोडून नवीन शेती पद्धतीचा अवलंब केल्यास अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि कल्पकता या माध्यमातून शेतीमध्ये नवनवीन प्रयोग होऊ शकतात.  अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यातील मासोद येथील अल्प भूधारक शेतकरी राहुल मनोहरराव किटुकले (वय वर्षे 44) यांनी हे दाखवून दिले आहे. पारंपारिक पिक पद्धतीवर अवलंबून राहण्याऐवजी आधुनिक पद्धतीने शेती केल्यास शेतकी उत्पादनात निश्चित वाढ होते. शेतीपिकासोबत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत (पोकरा) पॉली हाऊसमध्ये जरबेरा फुल पीक लागवडीच्या माध्यमातून श्री. किटुकले या प्रगतशील शेतकऱ्याची शेती परिसरातील शेतकऱ्यांसाठी आदर्श शेती ठरत आहे. नुकतेच जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी या जरबेरा शेतीला भेट देवून माहिती जाणून घेतली. यावेळी श्री. कटियार यांनी शेतकऱ्यांचे कौतुक करुन इतर शेतकऱ्यांनीही अशा फुलशेतीसाठी वळण्याचे आवाहन केले.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत मौजे मासोद येथे पॉली हाऊसमध्ये जरबेरा फुलांची श्री. किटुकले यांनी लागवड केली आहे. या प्रकल्पात नियंत्रित शेती अंतर्गत 1 पॉली हाऊस व 7 शेड नेटची उभारणी करण्यात आली आहे. कृषी विभागामार्फत शेतकरी प्रशिक्षणासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत 8 शेतकऱ्यांना ‘हॉर्टिकल्चर ट्रेनिंग सेंटर’, तळेगाव दाभाडे येथे पाठविण्यात आले. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून नवनवीन प्रयोग व तंत्रज्ञान आत्मसात करुन आधुनिक व नाविण्यपूर्ण तंत्रज्ञानाचा आपल्या शेतात वापर करुन श्री. किटुकले या शेतकऱ्याने जरबेरा फुलांची शेती फुलविली आहे. यातून या शेतकऱ्याला चांगले उत्पन्न मिळाले असून त्यांची शेती बघण्यासाठी दूरवरुन शेतकरी, शेती अभ्यासक, कृषी तज्ज्ञ तसेच नागरिक येत असतात.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत तळेगाव दाभाडे येथे आयोजित प्रशिक्षणामध्ये प्रक्षेत्र भेटीमार्फत शेतकर्‍यांना प्रत्यक्ष माहिती आणि अनुभव देण्यात आला. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून श्री. किटुकले यांनी त्यांच्या पॉली हाऊस मध्ये 0.10 आर क्षेत्रावर जरबेरा फुल पिकाची लागवड केली. प्रशिक्षणामध्ये त्यांना जरबेरा फुलांची लागवड, फुलांसाठी पोषक वातावरण निर्मिती तसेच फुलांची हाताळणी याबाबत सविस्तर प्रशिक्षण मिळाले.या प्रशिक्षणाचा खूप फायदा झाल्याचे श्री. किटुकले यांनी सांगितले.

मौजे मासोद येथील राहुल किटुकले, यांचे गट क्र 59 मध्ये 0.58 आर एवढे शेती क्षेत्र आहे. मौजे मासोद येथे सन 2018-19 पासून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविण्यात येत आहे. यासाठी श्री. किटुकले यांनी पॉली हाऊससाठी प्रस्ताव सादर करुन पॉली हाऊसची उभारणी केली. त्यासाठी त्यांना नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेंतर्गत 0.10 क्षेत्रासाठी 7 लक्ष 6 हजार 668 रुपये (75 टक्के) एवढे अनुदान शासनाकडून मिळाले. पूर्वी पारंपारिक शेतीमध्ये फुलपिकांचे उत्पादन घेताना विशेष लाभ होत नव्हता. परंतु या प्रकल्पांतर्गत पॉली हाऊसची उभारणी केल्यानंतर श्री. किटुकले यांनी पॉली हाऊसमध्ये जरबेरा फुल पिकाची लागवड केली. जरबेरा फुल पिकापासून त्यांना चांगले उत्पादन मिळून त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले आहे. शिवाय त्यांच्या जरबेरा शेतीच्या माध्यमातून अन्य मजूरांना रोजगारही प्राप्त झाला.

राहुल किटुकले यांचे मनोगत

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेमुळे अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना उत्पादनाचे साधन मिळाले आहे. मला या पॉली हाऊस मधून 0.10 आर मध्ये जरबेरा फुल पिकाचे दर महिन्याला 2 हजार 500 फुलांच्या गुच्छांचे उत्पादन मिळते. एका गुच्छामध्ये 10 जरबेरा फुले असून प्रती 40 रुपये दराने एक गुच्छ विकले जातो. यातून दर महिन्याला 1 लक्ष रुपये एवढे उत्पादन मिळते. त्यापैकी 40 हजार रुपये मजूरी, खत, फवारणीमध्ये खर्च होऊन 60 हजार रुपयांची बचत होते. या उत्पादित मालाची विक्री अमरावतीसह नागपूर बाजारपेठेत करण्यात येते. या योजनेमुळे माझे आर्थिक व सामाजिक जीवनमान उंचावल्यामुळे मी समाधानी आहे.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन संरक्षित बाबी अंतर्गत पॉली हाऊस आणि शेडनेट हाऊसची उभारणी करुन फुले, पीके व भाजीपाला यांची लागवड करुन दरमहा उत्पादन देणारी संरक्षित शेती करावी. मोर्शी उपविभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, चांदूरबाजार मंडळ, आसेगाव पूर्णा कृषी अधिकारी, कृषी सहायक, समुह सहायक यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले आहे.

  • प्र. जिल्हा माहिती अधिकारी, अपर्णा यावलकर, अमरावती.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here