विदर्भात आत्तापर्यंत ५६६.२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. काही दिवसांपासून हीच सरप्लस नोंद होती मात्र पावसाने दांडी मारल्याने त्यात किंचितही वाढ झालेली नाही. आता त्यात सरासरी ५ ते ८ टक्क्यांनी पातळी घासरली असल्याचे चिन्ह आहे. जून ते ऑगस्ट पर्यंत सरासरी ५९६.५ मिलिमीटर पाऊस होणे अपेक्षित होता. जिल्हा निहाय विचार केल्यास नागपुरात पाऊस सरासरीपेक्षा पाच ते सात टक्क्यांनी खाली घसरला आहे. पूर्व विदर्भातील चंद्रपूर,गडचिरोली, भंडारा सध्या तरी सामान्य स्थितीत आहे पण पाऊस झाला नाही तर त्यात घसरण होण्याची भीती आहे.
पश्चिम विदर्भातील अकोला व अमरावतीतील स्थिती ही धोकादायक झाली असून पाऊस अनुक्रमे सरासरी २२ आणि २६ टक्क्यांनी घसरला आहे केवळ यवतमाळ सुस्थितीत आहे. मात्र आगामी काळात पाऊस झाला नाही तर पुढील स्थिती चिंताजनक असणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आगामी १७-१८ तारखेनंतर विदर्भात पावसाची शक्यता आहे.पाऊसाने विश्रांती घेतल्यानंतर तापमानातही मोठी वाढ झाली आहे. १६ ऑगस्ट रोजी वर्धा येथे ३३ अंश सेल्सिअस हे तापमान विदर्भातील सर्वाधिक तापमान म्हणून नोंदवण्यात आले आहे.
विदर्भात १८ ऑगस्ट नंतर सर्वत्र पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर दिनांक १८ ऑगस्ट रोजी भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती या ठिकाणी सर्वत्र पाऊस होईल असा अंदाज नागपूर प्रादेशिक विभागाच्या वतीने वर्तवण्यात आला आहे. पावसाच्या गैरहजेरीमुळे नागपूरसह अनेक जिल्ह्यात उकाडा जाणवत असल्याने शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांना देखील पावसाची प्रतीक्षा करत आहे.