महाबळेश्वर, पाचगणीसह कांदाटी खोऱ्यातील पर्यटन वाढीसाठी कटिबद्ध – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे – महासंवाद

महाबळेश्वर, पाचगणीसह कांदाटी खोऱ्यातील पर्यटन वाढीसाठी कटिबद्ध – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे – महासंवाद

सातारा दि. 13(जि.मा.का.) :  महाबळेश्वर, पाचगणीसह कांदाटी खोऱ्यातील स्थानिक नागरिकांना रोजगार मिळावा हा प्रमुख उद्देश ठेवून या भागातील पर्यटन वाढीसाठी  शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

दरे, ता. महाबळेश्र्वर येथे   तापोळा, कोयना व महाबळेश्वर परिसरातील सुरू असलेल्या व प्रस्तावित पर्यटन प्रकल्पाच्या कामांचा आढावा  बैठक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.  बैठकीस  अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, जिल्हा परीषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधिक्षक समीर शेख, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, सार्वजनिक बांधकाम विभागाचे  अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, राज्य रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता श्री. वसईकर,  सिंचन विभागाचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक,  जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प (राखीव) कराडचे उपसंचालक किरण जगताप, एम टी डी सी च्या अतिरिक व्यवस्थापक मोशनी कोसे, राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वर्षा पवार आदी, पाटण चे प्रांताधिकारी सोपान टोणपे, महाबळेश्र्वर, पाटण व जावळीचे तहसीलदार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महाबळेश्वर व पाचगणीसह कंदाटी खाऱ्यात येणाऱ्या पर्यटकांना वाहतूक कोंडीसह पार्कींग समस्येचा सामना करावा लागतो. यातून पर्यटकांना दिलासा मिळण्याच्या दृष्टीने मार्ग काढावा. पाचगणी व महाबळेश्वर येथे एस टी डेपो जवळ 300 गाड्यांची पार्कींग व्यवस्था होईल, असे वाहनतळ विकसित करावे. तसेच येणाऱ्या पर्यटकांकडून प्रति माणूस टोल जातो, यात सुसुत्रता आणण्यासाठी प्रतिवाहन फॅास्टटॅग पध्दतीने कराची रक्कम गोळा करावी. त्यामुळे लोकांची गैरसोयी दूर होतील.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे महाबळेश्वर येथे कार्यालय सुरु करावे, असे सांगून श्री. शिंदे म्हणाले, तेथील अधिकाऱ्यांना पुरेसे अधिकार द्यावेत.  नवीन ठिकाणच्या पर्यटन वाढीसाठी ड्रोनद्वारे तात्काळ सर्व्हे करावा, जेणेकरुन पायाभूत सुविधा देता येतील.  हेलीपॅड राईडसाठी पर्यटनाच्या ठिकाणी हेलीपॅड व्यवस्था करावी. मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देऊ शकतात. तापोळा ते उत्तरेश्वर येथे रोपवे करण्याच्या कामास गती द्यावी, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

पाण्याचे प्रदूषण न करता हाऊस बोटी सुरु करा, यातून स्थानिकांना रोजगार मिळेल, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व  महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ ह्या दोघांनी मिळून पर्यटकांना राहण्यासाठी चांगल्या प्रकारच्या टेंटची निर्मिती करावी.  यातून स्थानिक लोकांना रोजगार मिळेल, असेही श्री. शिंदे यांनी सांगितले.

बांबू लागवडीसाठी प्रत्येक झाडाला 175 अनुदान मिळते. तीन वर्षात प्रति हेक्टर 7 लाखापर्यत अनुदान मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी बांबू लागवड व इतर फळ पिकांच्या लागवडीसाठी प्रयत्न करावे, असे निर्देशही त्यांनी दिले. यावेळी  महाबळेश्वर तालुक्यातील 105 गावांच्या पाणी पुरवठा योजनांचा व बुडीत बंधाऱ्यांचा आढावाही घेण्यात आला.  कोयना धरणातील पाणी जसे जसे कमी होत जाईल तसा त्यातील गाळ काढण्याच्या कामाला प्राधान्य द्यावे, असेही निर्देश उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुनावळेच्या कोयना जल पर्यटन केंद्राला भेट

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुनावळे येथील कोयना जल पर्यटन केंद्राला भेट देवुन सद्यपरिस्थितीतील चालू  व प्रस्तावित प्रकल्पांची माहिती घेतली. यावेळी स्थानिक नागरिकांनी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांना भेटून आपल्या समस्या मांडल्या. यावेळी पर्यटन प्रकल्प विकसित करताना  स्थानिक नागरिकांनाच रोजगार मिळण्यासाठी प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासनही श्री. शिंदे यांनी दिले.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here