लातूर, दि. ११ : सहकार विभागाच्या माध्यमातून गाव पातळीवरील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या बळकटीकरणासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या संस्थांना आर्थिक सहाय्य देवून त्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी गोडावून उभारणी, विविध सेवांचा पुरवठा, कामकाजाचे संगणकीकरण आदी कामांसाठी मदत करण्यात येत असल्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले.
अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथे अंतर्गत रस्ते विकास कामाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी त्यांनी कुदळ मारून सिमेंट रस्ता कामाचे भूमिपूजन केले. उपसरपंच विठ्ठल बोडके, ग्रामपंचायत सदस्य निजाम शेख, धनराज बोडके, चंद्रप्रकाश हंगे, श्रीहरी चाटे यांच्यासह सुनील वावळे, ग्रामपंचायत अधिकारी राजेंद्र कांबळे, ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
आपल्या राज्याच्या विकासात सहकारी संस्थांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे पुढील काळात सहकार चळवळ अधिक बळकट करून तळागळातील व्यक्तीला या चळवळीसोबत जोडण्याचे प्रयत्न केले जातील. तसेच अडचणीतील सहकारी संस्थांना मदत करण्यात येणार असून आवश्यकतेनुसार नवीन संस्थांची उभारणी देखील करण्यात येईल. सहकार चळवळीच्या माध्यमातून रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती ना. पाटील यांनी यावेळी दिली. तसेच किनगाव मधील अंतर्गत रस्त्यांच्या कामासोबतच गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.