कोल्हापूर, दि. ०६ (जिमाका): राज्यातील नागरिकांनी एचएमपीव्ही (HMPV) बाबत कोणत्याही अफवांवर, सोशल मीडियावरील बाबींवर विश्वास ठेवू नये. असे आवाहन आरोग्य व कुटूंबकल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरांजी येथे इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय सुविधा पाहण्यासाठी आले असता ते बोलत होते.
राज्याचा आरोग्य विभाग अत्यंत सक्षम असून आरोग्य विभागाच्या माध्यमातून कोरोनासारख्या गंभीर आजारालाही परतून लावले. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करावे आणि स्वत:ची काळजी घ्यावी, असे ते म्हणाले.
बेंगलोरमध्ये एचएमपीव्ही (HMPV) व्हायरसचा रुग्ण आढळून आला आहे. त्याबाबत देशपातळीवरील आरोग्य विभागाची यंत्रणा काम करेल. राज्यातील नागरिकांनी या आजाराबाबत योग्य ती काळजी घेण्यासाठी आरोग्य विभाग योग्य ते निर्देश देईल. याबाबत बैठक घेण्यात येणार असून बैठकीच्या माध्यमातून आरोग्य विभागाचे अधिकारी, सर्व डॉक्टर्स यांना सूचना देण्यात येतील. नागरिकांनी या आजराबाबत घाबरुन न जाता आरोग्य विभागाच्या आवश्यक त्या सूचनांचे पालन करावे.
कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या ज्या मार्गदर्शक सूचना होत्या त्याच सूचना या आजारासाठी असणार आहेत. आरोग्य विभागाच्या माध्यमातून या सूचना प्रकाशित करण्यात येणार आहेत. एचएमपीव्ही (HMPV) व्हायरस या संसर्गजन्य आजारासाठी जी काळजी घ्यायला हवी जसे हात स्वच्छ धुणे, शिंकताना, खोकताना रुमाल वापरणे अशा गोष्टींचे नागरिकांनी पालन करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
०००