सहकार क्षेत्रात पुरुषांसह महिलांनाही सामावून घेण्याचे शासनाचे धोरण – मंत्री बाबासाहेब पाटील – महासंवाद

सहकार क्षेत्रात पुरुषांसह महिलांनाही सामावून घेण्याचे शासनाचे धोरण – मंत्री बाबासाहेब पाटील – महासंवाद

सोलापूर दि.०५ (जिमाका): राज्याला सहकार चळवळ अत्यंत फायदेशीर ठरली असून या चळवळीत पुढील काळात पुरुषाबरोबरच महिलांनाही सामावून घेण्याचे शासनाचे धोरण आहे, व त्या दृष्टीने शासन पावले टाकत असल्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले.

सोलापूर शहरातील अंत्रोळीकरनगर येथे त्यांच्या हस्ते ब्रह्मदेव दादा माने सहकारी बँकेच्या 22 व्या शाखेचे उद्घाटन झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते.  यावेळी खासदार प्रणिती  शिंदे, आमदार विजयकुमार देशमुख, माजी आमदार दिलीप माने, प्राध्यापक शिवाजीराव काळुंगे, जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड तसेच बँकेचे चेअरमन सोमनाथ गायकवाड, नवीन शाखेचे व्यवस्थापक विनोद कुलकर्णी व अन्य मान्यवर उपस्थित होते.

केंद्र सरकारच्या सहकार विभागाच्या धोरणानुसार राज्यातील एकही नागरिक सहकार चळवळीपासून वंचित राहणार नाही या दृष्टीने शासन प्रयत्न करत आहे. त्यासाठी पुढील काळात सहकार चळवळीत महिलांचाही समावेश महत्त्वपूर्ण असल्याचे सहकार मंत्री श्री. पाटील यांनी सांगून राज्यातील एकही गरजू नागरिक सावकाराकडे पैशासाठी जाणार नाही. यासाठी सहकार क्षेत्रातील सर्व बँकांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. तसेच सहकार चळवळीत प्रचंड मोठी ताकद असून त्या त्या भागात व्यापार, उद्योगधंदे यासह सर्वांगीण विकासाला भरघोस मदत यातून होऊ शकते व महाराष्ट्रातील अनेक भागात तसे घडलेले आहे व पुढेही याच पद्धतीने सहकार क्षेत्राने काम करावे, असेही त्यांनी सांगितले.

सोलापूर येथे ब्रह्मदेव दादा सहकारी बँकेचे काम उत्कृष्ट असून यातून या भागातील गोरगरीब नागरिकांना वित्तीय सहाय्य मिळत असून हे काम बँकेने पुढेही तसेच चालू ठेवावे व अशीच प्रगती करावी, अशा शुभेच्छा सहकार मंत्री श्री. पाटील यांनी दिल्या. यावेळी खासदार प्रणिती शिंदे, आमदार विजयकुमार देशमुख यांनीही आपले मनोगत व्यक्त करून बँकेच्या 22 व्या शाखेला शुभेच्छा दिल्या.

तर माजी आमदार दिलीप माने यांनी ब्रह्मदेव दादा सहकारी बँकेच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या केलेल्या कामाच्या प्रगती अहवाल प्रस्ताविकात मांडला. प्रारंभी फित कापून व त्यानंतर दीप प्रज्वलन करून सहकार मंत्री व मान्यवरांनी बँकेच्या शाखेचे उद्घाटन केले.

जनकल्याण सोसायटीला भेट

सदर बाजार येथील जनकल्याण मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सदिच्छा भेट देऊन सोसायटीच्या कामकाजाची माहिती जाणून घेतली व जनकल्याण सोसायटीने गोरगरीब नागरिकांना कर्ज पुरवठा करून त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावावी, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी माजी आमदार दीपक साळुंखे, जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड, चेअरमन राजेंद्र हजारे, सीईओ आशा हजारे यांची उपस्थिती होती.

०००

 

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here