नियोजन प्राधिकरणांचे सक्षमीकरण करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

नियोजन प्राधिकरणांचे सक्षमीकरण करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद




मुंबई दि.4 – राज्यातील विविध नियोजन प्राधिकरणांचे सक्षमीकरण करुन त्यांचे कामकाज कंपनीच्या धर्तीवर करावे, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज नगरविकास विभागाच्या आगामी शंभर दिवसांच्या कामकाज नियोजनाबाबत बैठक झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. सह्याद्री राज्य अतिथी गृह येथे झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, राज्य मंत्री माधुरी मिसाळ, राज्य मंत्री पंकज भोयर आदी उपस्थित होते.

नगरविकास विभाग(एक)चे अपर मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता यांनी विभागाचे सादरीकरण केले. त्यांनी सादरीकरणातून नगरविकास विभागाच्या अखत्यारीत असलेले विविध नियोजन प्राधिकरण यांचे सक्षमीकरण करणे, शहरां जवळील सुमारे साडेतीन हजार गावांत रस्ते विकासाचे नियोजन करणे, राज्यातील दहा लाखांवरील शहरांत नागरी संकल्प प्रकल्प राबविणे, इमारत परवाने देण्याच्या प्रक्रियेचे संगणकीकरण करणे, पर्यटन धोरणानुसार एकत्रित नागरी विकास आणि नियंत्रण नियमावलीत बदल करण्याबाबतची माहिती दिली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, राज्यातील शहरांच्या विकासासाठी निधी खर्च करण्याची आवश्यकता आहे. शहरातील पायाभूत विकासासाठी भांडवली गुंतवणूक करावीच लागणार आहे. मात्र यासाठी निधी उभारण्यासाठी नाविन्यपूर्ण आर्थिक पर्याय उभारले पाहिजेत, अशा सूचना दिल्या.

राज्यातील प्रत्येक शहरात चित्रपटांसाठीची थिएटरची संख्या वाढण्याची गरज आहे. यासाठी सध्या असलेल्या सिंगल स्क्रीन थिएटरना काही सवलती देता येईल का, तसेच मराठी नाटक आणि चित्रपट एकाच थिएटरमध्ये दाखवता येईल का याबाबत विचार करावा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. सोलापूर स्मार्ट सिटीच्या पाणी पुरवठा योजनेच्या निधी साठीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात यावी. यामुळे सोलापूरवासियांच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी.गुप्ता, मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव डॉ. श्रीकर परदेशी आदी अधिकारी उपस्थित होते.

000

 







Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here