प्रगतीशील महाराष्ट्र, गतीशील महाराष्ट्राच्या निर्धारासाठी एकजूट करुया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

प्रगतीशील महाराष्ट्र, गतीशील महाराष्ट्राच्या निर्धारासाठी एकजूट करुया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद




मुंबई, दि. 31 :- नवा महाराष्ट्र घडवायचा आहे. प्रगतीशील महाराष्ट्राला आणखी गतीशील बनवायचे आहे. त्यासाठी आपण सर्वांनी ..महाराष्ट्र आता थांबणार नाही…अशी प्रतिज्ञा करूया, एकजूट करुया असा निर्धार व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हा निर्धार पूर्ण करण्यासाठी राज्यातील कष्टकरी, शेतकरी, कामगारासह सर्वांचीच साथ लाभेल, असा विश्वास देखील मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला दिलेल्या शुभेच्छा संदेशात नमूद केला आहे.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणतात, ‘येणारे वर्ष सुख, समाधान आणि समृद्धी घेऊन येवो. महाराष्ट्राच्या प्रगतीची पताका अखंडीत फडकत ठेवण्याची ऊर्जा आणि उर्मी मिळत राहो, हीच मनोकामना. छत्रपती शिवाजी महाराज आणि अनेक थोर संतांच्या आशीर्वादाच्या छत्रछायेखालील महाराष्ट्राला आधुनिकीकरणाच्या या युगात जगातील सर्वोत्तम राज्य म्हणून अग्रेसर ठेवायचे आहे. आपल्या कष्टकरी, शेतकरी, कामगारांच्या राबणाऱ्या आणि कला-क्रीडा-साहित्य-संस्कृती क्षेत्रातील सर्जक हातांनी या राज्याच्या वैभवात भरच घातली आहे. हा लौकिक आपल्याला वाढवायचा आहे. शेती-माती व सिंचन, शिक्षण, आरोग्य, उद्योग- ऊर्जा, माहिती तंत्रज्ञान ते नवनव्या औद्योगिक क्रांती यांना पादाक्रांत करायचे आहे. यासाठी राज्यातील शांतता-सलोखा, परस्पर स्नेह, आदरभाव वृद्धिंगत होईल. पर्यावरण आणि जल-जंगल-जमीन यांचं जतन-संवर्धन होईल, असे प्रयत्न करायचे आहेत. हा संकल्प घेऊन वाटचाल करायची आहे, त्यासाठी नववर्ष चैतन्यदायी ठरेल. सकारात्मक ऊर्जेने भारलेल्या नवसंकल्पना घेऊन येईल. यातून आपला महाराष्ट्र आता थांबणार नाही, हा यत्न पूर्णत्वास जाईल. अशी मनोकामना करतो. तशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, असे नमूद करून मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी शुभेच्छा देऊन सगळ्यांचे नववर्षाभिनंदन केले आहे.

००००







Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here