पोलीस क्रीडा स्पर्धेतून ऑलम्पिक दर्जाचे खेळाडू तयार होतील – विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार – महासंवाद

पोलीस क्रीडा स्पर्धेतून ऑलम्पिक दर्जाचे खेळाडू तयार होतील – विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार – महासंवाद

  • ५० व्या कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेतील जनरल चॅम्पियनशीप चषक सातारा व कोल्हापूर पुरूष

   गटाला विभागून तर महिलांमध्ये कोल्हापूर जिल्ह्याची बाजी

  • ५० व्या कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेची सांगता भव्य समारोपीय समारंभातून संपन्न

कोल्हापूर, दि.4 : पोलीस विभागामार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या क्रीडा स्पर्धेतून ऑलम्पिक दर्जाचे खेळाडू तयार होतील असा विश्वास पुणे विभागाचे आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी 50 व्या कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेच्या समारोपीय समारंभावेळी बोलताना व्यक्त केला. त्यांच्या हस्ते या स्पर्धेतील विजेत्या खेळाडू व संघांना बक्षिस वितरित करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, प्रत्येकाच्या जीवनात खेळाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आपली मानसिक व शारिरिक तयारी ठेवण्यासाठी कोणत्याही क्रीडा प्रकाराची आवड असणे गरजेचे आहे. कोल्हापूर सारख्या जिल्ह्यात क्रीडा प्रकारांना सर्वोच्च स्थान असल्याने अजूनच या स्पर्धेला रंगत प्राप्त झाली. खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या स्पर्धेतून अनेक चांगले खेळाडू पुढे येतील. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्यासाठी पोलीस विभागातील खेळाडूंनी अजून आपली कामगिरीमध्ये सुधारणा करावी असेही ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्‍हापूर परिक्षेत्र सुनिल फुलारी, प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे, पोलीस अधीक्षक कोल्हापूर महेंद्र पंडित, पोलीस आयुक्त सोलापूर शहर एम.राजकुमार, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण पंकज देशमुख, पोलीस अधीक्षक सांगली संदिप घुगे, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक सातारा समीर शेख, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. उपस्थित होते.

कोल्हापूर परिक्षेत्रातील 50 व्या पोलीस क्रीडा स्पर्धाला शुक्रवार दि. 29 नोव्हेंबर रोजी पोलीस मैदानावर सुरुवात झाली. त्याचे उद्घाटन पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या हस्ते झाले होते. या स्पर्धेत कोल्हापूरसह, सांगली, सातारा, सोलापूर शहर, सोलापूर ग्रामीण आणि पुणे ग्रामीण येथून एकूण 19 संघ एकल व सांघिक गटात सहभागी झाले होते. 1,200 हून अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी जवळपास 19 विविध क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेतला. यात जनरल चॅम्पियनशीप चषक सातारा व कोल्हापूर पुरूष गटाला विभागून मिळाला तर महिलांमध्ये कोल्हापूर जिल्ह्याने बाजी मारत जनरल चॅम्पियनशीप चषकाला गवसणी घातली. पोलीस विभागातील खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या स्पर्धेचा उद्देश होता. या स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या संघांना राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये भाग घेता येणार आहे. पुढिल वर्षीची स्पर्धा पुणे ग्रामीण यांच्याकडे आयोजित केली जाणार आहे. याची घोषणा व ध्वज हस्तांतरण यावेळी करण्यात आले.

व्हॉलीबॉल, हँडबॉल, कबड्डी, खो-खो, फुटबॉल, हॉकी, बास्केटबॉल, जलतरण, ॲथलेटिक्स, क्रॉस कंट्री, मॅरेथॉन, कुस्ती, ज्युडो, बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग अशा विविध खेळांचे सामने या स्पर्धेत झाले. यावेळी पहिल्यांदाच वुशू सारख्या खेळाचा समावेश करण्यात आला होता. कार्यक्रमाचे आध्यक्ष विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्‍हापूर परिक्षेत्र सुनिल फुलारी यांनी या स्पर्धेच्या चांगल्या आयोजनासाठी कोल्हापूर पोलीस अधीक्षक व त्यांच्या टीमचे अभिनंदन केले. ते म्हणाले, पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी लोकसभा, विधानसभा तसेच इतर महत्त्वाच्या वय्क्तींचे दौरे विभागातील महत्त्वाचे सन उत्सव अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडले. त्यांचा थकवा या स्पर्धेतून नक्कीच दूर झाला असेल. तसेच त्यांना कामाच्या दैनंदिन परिस्थितीतून एक वेगळे वातावरण देण्याचा प्रयत्न यातून केला. या स्पर्धेतून मिळालेली ऊर्जा चांगल्या कामी खर्ची घालावी तसेच नियंत्रित गुन्हेगारी कायम राहिल यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावेत असे आवाहनही त्यांनी यावेळी मनोगतामधून व्यक्त केले. प्रास्तविकात पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पोलीसांच्या समोरील विविध आव्हाणे व बदलते कामाचे स्वरूप यातून त्यांना चांगले वातावरण निर्माण व्हावे व त्यांना सांघिक भावना निर्माण व्हावी यासाठी अशा स्पर्धांची गरज असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांनी मानले तर सुत्रसंचलन मोनिका जाजू यांनी केले. कार्यक्रमात वारणा व्हॅली स्कूल, तळसंदे येथील मुलांनी मल्लखांब क्रीडा प्रकारातील रोमहर्षक प्रात्यक्षिके सादर केली.

विजेते संघ व खेळाडू पुढीलप्रमाणे –

  1. 4 बाय 100 मीटर रिलेमध्ये

पुरूष गटात सुवर्ण -कोल्हापूर, रौप्य – सातारा व  कांस्य – सांगली

महिला- 3 सुवर्ण कोल्हापूर, 2 रौप्य सातारा व 1 कांस्य पुणे ग्रामीण

2.त्वायक्वांदो- पुरुष – कोल्हापूर, महिला- कोल्हापूर

3.वुशू- पुरुष- कोल्हापूर, महिला- कोल्हापूर

4.वेटलिफ्टिंग- पुरुष- सातारा, महिला- सातारा

5.ज्युदो- पुरुष- सातारा, महिला- सातारा

6.कुस्ती- पुरुष-सातारा, महिला- सातारा

7.बॉक्सिंग- पुरुष- सातारा, महिला- सांगली

8.खो-खो- पुरुष- सांगली, महिला-  सोलापूर ग्रामीण

9.कबड्डी- पुरुष- पुणे ग्रामीण, महिला- कोल्हापूर

10.बास्केटबॉल- पुरुष- सोलापूर शहर, महिला- सोलापूर शहर

11.व्हालीबॉल- पुरुष- सांगली, महिला- कोल्हापूर

12.जलतरण- सातारा

13.हॅन्डबॉल – सांगली

14.हॉकी – कोल्हापूर

15.फुटबॉल- कोल्हापूर

16.क्रॉसकंट्री – पुरुष- सोलापूर शहर, महिला- कोल्हापूर

17.ॲथलॅटिक्स- पुरुष- कोल्हापूर, महिला- कोल्हापूर

18.बेस्ट ॲथलिट- पुरुष- अमृत तिवले, कोल्हापूर, महिला- सोनाली देसाई, कोल्हापूर

अशा प्रकारे जनरल चॅम्पियनशीप  पुरुष गट – कोल्हापूर व सातारा जिल्हा विभागून मिळाली तर महिला गटात कोल्हापूरने बाजी मारली.

00000000

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here