विधानसभा निवडणुकीसाठी मुंबई शहर जिल्हा प्रशासन सज्ज – अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव – महासंवाद

विधानसभा निवडणुकीसाठी मुंबई शहर जिल्हा प्रशासन सज्ज – अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव – महासंवाद

  • मतदारांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन मतदान करण्याचे आवाहन
  • मुंबई शहर जिल्ह्यात २५ लाख ४३ हजार ६१०
  • २ हजार ५३८ मतदान केंद्रे

मुंबई, दि. १९ : मुंबई शहर जिल्ह्यातील दहा मतदारसंघांमध्ये विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी बुधवार, दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतदानासाठी मुंबई शहर जिल्हा प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण झाली असून प्रशासन सज्ज आहे. लोकशाहीच्या या उत्सवात जिल्ह्यातील सर्व मतदारांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपल्या मतदानाचा हक्क आवर्जून बजावावा, असे आवाहन मुंबई शहराचे जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी केले आहे. मतदान मुक्त, निष्पक्ष, पारदर्शक व शांततामय वातावरणात होण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती श्री. यादव यांनी सांगितले.

दहा विधानसभा मतदारसंघात एकूण १०५ उमेदवार

मुंबई शहर जिल्ह्यात २५ लाख ४३ हजार ६१० मतदारतर २ हजार ५३८ मतदान केंद्रे

मुंबई शहर जिल्ह्यात मतदानासाठी सुमारे १२ हजार ५०० कर्मचारी

विधानसभा निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने मुंबई शहर जिल्ह्याअंतर्गत असलेल्या दहा विधानसभा मतदारसंघात २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी मतदार केंद्राला प्रत्येकी एक असे २५३८ बीएलओ आहेत. एकूण ३६४ क्षेत्रीय अधिकारी (Z.O) आहेत. जवळपास १२ हजार ५०० पेक्षा अधिक मनुष्यबळ निवडणूक कामकाजासाठी उपलब्ध आहे.

मुंबई शहर जिल्ह्यातील निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारांची माहिती

एकूण मतदार :- २५ लाख ४३ हजार ६१०

  • महिला  –  ११ लाख ७७ हजार ४६२
  • पुरुष – १३ लाख ६५ हजार ९०४
  • तृतीयपंथी– २४४
  • ज्येष्ठ नागरिक (८५+) – ५३ हजार ९९१
  • नवमतदार संख्या (१८-१९ वर्ष)– ३९ हजार ४९६
  • दिव्यांग मतदार – ६ हजार ३८७
  • सर्व्हिस वोटर – ३८८
  • अनिवासी भारतीय मतदार – ४०७

विधानसभा मतदार संघनिहाय मतदार संख्या

धारावी – २६१८६९

सायन-कोळीवाडा  – २८३२७१

वडाळा – २०५३८७

माहिम – २२५९५१

वरळी – २६४५२०

शिवडी – २७५३८४

भायखळा – २५८८५६

मलबार हिल – २६११६२

मुंबादेवी – २४१९५९

कुलाबा – २६५२५१

मुंबई शहर जिल्ह्यातील मतदान केंद्रे

एकूण मतदान केंद्र – २५३८

उत्तुंग इमारतीमधील (Highrise Building) मतदान केंद्र –   १५६

सहकारी गृहनिर्माण सोसायटी मधील मतदान केंद्र – १००

झोपडपटटी परिसरात मतदान केंद्र – ३१३

मुंबई शहर जिल्ह्यात मंडपातील मतदान केंद्र – १०१

पहिल्या मजल्यावरील मतदान केंद्र – १७

एकूण सहाय्यकारी मतदान केंद्र:- ०१

एकूण सखी महिला मतदान केंद्रः- १२

नवयुवकांसाठी मतदान केंद्रः- १२

दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्र :- ०८

ईव्हीएम

अ) Ballot Unit – ३०४१

ब)  Control Unit – ३०४१

क)  VVPAT –  ३२९४

मतदान केंद्रांवर सुविधा उपलब्ध 

मुंबई शहर जिल्ह्यात २५३८ मतदान केंद्रे आहेत. या सर्व मतदान केंद्रांवर मतदारांसाठी प्रशासनातर्फे सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. किमान सुविधा (Assured Minimum Facilities) अंतर्गत मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांवर मतदारांसाठी स्वच्छतागृह, प्रतिक्षालय, रांगा लागल्यास ठराविक ठिकाणी मतदारांना बसण्यासाठी व्यवस्था, दिव्यांगांसाठी व्हीलचेअर, रॅम्प, मदतीसाठी दिव्यांग मित्र स्वयंसेवक, मैदानाच्या ठिकाणी मंडप, कचरापेटी, पंखे, पुरेशी प्रकाश व्यवस्था, मोकळ्या मैदानाच्या ठिकाणी मंडप, दिशादर्शक फलक, मेडिकल किट आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांना मतदानाच्या दिवशी सुविधा 

विधानसभा निवडणुकीसाठी मुंबई शहर जिल्हा निवडणूक प्रशासनाने दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक (८५ वर्ष व त्यापेक्षा अधिक) मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर जाण्याकरिता सक्षम ॲपवर नोंदणी केलेल्या मतदारांना पर्यायी सुविधा उपलब्ध करून दिली. या ॲपवर नोंदणीकृत दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांना संबंधित सुविधा पुरविणा-या शासकीय व स्थान निश्चिती यंत्रणेला दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांच्या मागणीनुसार आवश्यक मदत म्हणजेच गरजेनुसार वाहतूक व्यवस्था, व्हीलचेअर, सहाय्यक पोहोचविण्याची व्यवस्था केली जाणार आहे. सक्षम मोबाईल ॲपवर नोंदणी न करू शकलेल्या काही दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांची मागणी नोंदविण्यात येत असल्याचे श्री. यादव यांनी सांगितले. मतदानाच्या दिवशी दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांची मतदान केंद्रावर ने-आण करण्यासाठी मुंबई शहर जिल्हा प्रशासनातर्फे मोफत वाहन व्यवस्था सुविधा उपलब्ध करून दिली आहे. दिव्यांग मतदारांच्या सुविधेसाठी प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय  मोफत बस प्रवासासाठी दिव्यांग समन्वय अधिकारी नेमले आहेत. मोफत बस सुविधेकरिता बेस्टकडून मतदान केंद्राच्या लोकेशननुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी रूट प्लान तयार करण्यात आला आहे. समन्वय अधिकारी व रूट प्लान एका क्लिकवर मतदारांना मिळण्यासाठी क्युआर कोड तयार करण्यात आला आहे.

मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास मनाई 

२० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी मतदारांना मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास मनाई असणार आहे. मतदान केंद्रांवर मोबाइल घेऊन जाण्यास मनाई असल्याचे स्पष्ट निर्देश मा. भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत. आयोगाच्या प्रत्येक निर्देशाची अंमलबजावणी कसोशीने होईल याकडे मुंबई शहर जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेचा कटाक्ष आहे. मतदान प्रक्रियेत बाधा निर्माण करण्यासाठी, मतदान केंद्रांवरील शांतता भंग करण्यासाठी तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्यासाठी मोबाइलचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर मोबाइल घेऊन जाण्यास मज्जाव असणार आहे.

मतदार यादीत नाव तपासून घ्या  

मतदार यादीत तुमचं नाव आहे की नाही हे पाहण्यासाठी https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  मुंबई शहर जिल्हा प्रशासनातर्फे क्यूआर कोड ठिकठिकाणी प्रदर्शित करण्यात आले असून त्या माध्यमातूनही नागरिकांना मतदार यादीत आपले नाव तपासता येणार आहे.

मतदार ओळखपत्र व्यतिरिक्त अन्य १२ ओळखीचे पुरावे मतदानासाठी ग्राह्य

मतदानासाठी मा. भारत निवडणूक आयोगाने मतदार ओळखपत्र (EPIC) व्यतिरिक्त अन्य १२ ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले असून त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदारांना मतदान करता येईल.

         मतदार ओळखपत्र आहे असे मतदार मतदान केंद्रावर आपली ओळख पटविण्यासाठी  मतदार ओळखपत्र सादर करतील.   मतदार ओळखपत्र सादर करू शकणार नाहीत अशा मतदारांची ओळख पटविण्यासाठी निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या १२ पैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे. यामध्ये

१) आधार कार्ड,

२) मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र,

३) बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक,

४) कामगार मंत्रालयाद्वारा वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड,

५) वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स),

६) पॅन कार्ड,

७) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड

८) भारतीय पारपत्र (पासपोर्ट)

९) निवृत्तीवेतनाची दस्तावेज

१०) केंद्र अथवा राज्य शासन, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र

११) संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र

१२) भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाच्यावतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र असे १२ पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. प्रवासी भारतीयांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट आवश्यक असणार आहे.

         मतदारांनी मतदान केंद्रावर जाताना मतदार माहिती चिठ्ठी आणि मतदार ओळखपत्र किंवा वरील १२ पैकी कोणताही एक पुरावा सोबत घेवून जाणे आवश्यक आहे.

KYC App – उमेदवारांबाबत माहिती या ॲपवर उपलब्ध होऊ शकेल

Cvigil ॲप च्या मदतीने आचारसंहिता उल्लंघन संदर्भातील तक्रार मतदारांना करता येते. या ॲपवर केलेल्या तक्रारींचे १०० मिनिटांत निराकरण केले जाते.

मतदार हेल्पलाईन क्रमांक  १९५०

जिल्हाधिकारी मुंबई शहर यांचे कार्यालय- नियंत्रण कक्ष क्रमांक  ०२२-२०८२२७८१

निवडणूक नियंत्रण कक्ष  ७९७७३६३३०४

000

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here