मुंबई शहर जिल्ह्यातील दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांकरिता मतदानासाठी मोफत वाहन व्यवस्था – महासंवाद

मुंबई शहर जिल्ह्यातील दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांकरिता मतदानासाठी मोफत वाहन व्यवस्था – महासंवाद

  • विधानसभा मतदारसंघनिहाय दिव्यांग समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती
  • समन्वय अधिकारी व रूट प्लानची माहिती मिळण्यासाठी क्युआर कोडची निर्मिती

मुंबई, दि. १८ :  विधानसभा निवडणुकीसाठी मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात बुधवार, २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ०७.०० ते सायंकाळी ०६.०० या वेळेत मतदान होणार आहे. ‘एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये’ (No voters to be left behind) या निवडणूक आयोगाच्या घोषणेप्रमाणे मतदानाच्या दिवशी दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांची मतदान केंद्रावर ने-आण करण्यासाठी मुंबई शहर जिल्हा प्रशासनातर्फे मोफत वाहन व्यवस्था सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांच्या सुविधेसाठी प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय मोफत बस प्रवासासाठी दिव्यांग समन्वय अधिकारी नेमले आहेत. मोफत बस सुविधेकरिता बेस्टकडून मतदान केंद्राच्या निश्चित ठिकाणानुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी रूट प्लान तयार करण्यात आला आहे. समन्वय अधिकारी व मार्ग नियोजन (रूट प्लान) एका क्लिकवर मतदारांना मिळण्यासाठी क्युआर कोड तयार करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील जास्तीत जास्त दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांनी या सेवेचा लाभ घेऊन मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी केले आहे.

भारत निवडणूक आयोगाने दिव्यांग मतदार तसेच ८५ वयापेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिक मतदारांच्या सोयी सुविधांबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. यामध्ये दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक यांना मतदान केंद्रावर सोयी-सुविधा पुरविण्याचे निर्देश आहेत. या निर्देशानुसार मुंबई शहर जिल्हा निवडणूक यंत्रणेमार्फत मतदानाच्या दिवशीचे काटेकोरपणे नियोजन करण्यात आले असून दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांसाठी विशेष सोयी – सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या मतदारांना आपल्या मतदान केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी मतदार संघनिहाय समन्वय अधिकारी, दिव्यांग मित्र यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांनी सदर विशेष सुविधेचा लाभ घेण्यासाठी १९५० या टोल फ्री क्रमांकावर किंवा समन्वयक दिलीप यादव यांच्याशी  ७३८५९१९४०३ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन श्रीमती सुनिता मते जिल्हा दिव्यांग नोडल अधिकारी मुंबई शहर यांनी केले आहे. क्युआर कोडवर क्लिक केल्यानंतर मतदारांना मतदार संघ निहाय नेमलेले  समन्वय अधिकारी, बसचा रूट प्लान यांची माहिती मिळणार आहे.

सर्व विधानसभा मतदारसंघामध्ये दिव्यांग मतदारांकरिता दिव्यांग समन्वय अधिकारी याप्रमाणे ३७ दिव्यांग समन्वय अधिकारी नेमण्यात आलेले आहेत. बेस्ट बससेवा यांच्याकडून ज्येष्ठ नागरिक मतदार व दिव्यांग मतदार यांना मतदान केंद्रावर ने-आण करणे करिता व्हीलचेअर, व्हीलचेअर व्हॅन, दिव्यांग सुलभ बसेस,  ईको व्हॅन,  टॅक्सी,  मतदानाच्या ठिकाणी जिन्यावर सरकत्या ‘व्हीलचेअर’ची (स्टेअर क्लायबिंग व्हीलचेअर) अशी वाहन उपलब्ध करून देण्यात आली आहेत. बेस्टच्या कर्मचाऱ्यांना मतदारसंघनिहाय नेमलेल्या दिव्यांग समन्वय अधिकारी यांचे भ्रमणध्वनी क्रमांक संपर्कासाठी देण्यात आले आहेत.

प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान केंद्रांनुसार बेस्ट बस सेवेच्या अधिकाऱ्यांनी रूट मॅप करून दिलेला आहे व त्यानुसार बस थांबे ठरवण्यात आलेले आहेत. या बस थांब्यावरून दिव्यांग व्यक्ती व ज्येष्ठ नागरिक मतदारांना या बस सेवेचा लाभ घेता येईल. तसेच लोको मोटर दिव्यांगांकरिता १० व्हीलचेअरयुक्त लो फ्लोर बसेस व त्यासोबत एक सहाय्यक उपलब्ध करून देण्यात येत आहे.

दिव्यांग मतदार व ज्येष्ठ नागरिक मतदारांना मदत करण्याकरिता एकूण ६७१ दिव्यांग मित्र राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक नियुक्त करण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी अरुंद रस्त्यामध्ये बस जाणार नाही, अशा ठिकाणी प्रत्येक मतदारसंघनिहाय दिव्यांगांच्या संख्येनुसार  टॅक्सी व इको व्हॅन प्रत्येकी २५ टॅक्सी २५ इको व्हॅन उपलब्ध करून देण्यात येत आहे. याप्रमाणे दिव्यांग मतदार व ज्येष्ठ नागरिक मतदारांना मतदान केंद्रापर्यंत ने-आण करण्याकरिता नियोजन करण्यात आलेले आहे.

दिव्यांग मतदारांना मोफत बस सुविधेसाठी विधानसभा मतदारसंघनिहाय समन्वय अधिकारी यांचे नाव व भ्रमणध्वनी क्रमांक खालीलप्रमाणे.

▶️ धारावी – श्री. अयाज शेख (९८९२२७०८२२)

▶️ सायन कोळीवाडा – विजय साळुंखे (८३६९५३२१३८)

▶️ वडाळा – शैलेन्द्र पवार (७३०३२२०९०५)

▶️ माहीम – रोशन पिंपळे (८९८३०४१२३६)

▶️ वरळी – ज्ञानेश्वर पाटील (९४२२२००१७६)

▶️ शिवडी – हेमलता भांगे (९९६७५२०१६५)

▶️ भायखळा – वर्षा डोकरे (९९३०३२१००१)

▶️ मलबार हिल – स्वाती जिरंगे (९८६९०२४२५४)

▶️ मुंबादेवी – सूचित पांचाळ (९९८७०४८२५३)

▶️ कुलाबा – दत्तात्रय कांबळे (९१३७५१३८३२)

**

शैलजा पाटील/विसंअ/

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here