मुंबई शहरातील १० हजारांहून अधिक मतदार असलेल्या मतदान केंद्रावर विविध रंग संकेतन – महासंवाद

मुंबई शहरातील १० हजारांहून अधिक मतदार असलेल्या मतदान केंद्रावर विविध रंग संकेतन – महासंवाद




मुंबई, दि. १७ : मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात दहा हजारांहून अधिक मतदार असलेल्या मतदान केंद्रांवर मतदान केंद्र शोधताना गोंधळ होऊ नये यासाठी मुंबई शहर जिल्हा निवडणूक कार्यालयातर्फे मतदारांकरिता विविध रंग संकेतन (Colour Coding) असलेले मतदान केंद्र तयार करण्यात येणार आहेत. मतदार माहिती चिठ्ठ्यांसह (Voter Information Slip) रंग संकेतन मतदान केंद्रांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचविण्यात आली आहे, असे मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी सांगितले.

मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई शहर जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून निवडणूक आयोगाच्या वतीने मतदारांसाठी विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

जिल्हाधिकारी श्री. यादव म्हणाले की, मुंबई शहर जिल्ह्यात दहा हजारांपेक्षा अधिक मतदार असलेली सुमारे ३१ मतदान केंद्र ठिकाणे असून या मतदान केंद्र स्थानांवर सुमारे ३६१ मतदान केंद्रे आहेत. यातील काही मतदान केंद्र स्थानांवर एकाच ठिकाणी १८ मतदान केंद्रे असून एका मतदान केंद्रावर सुमारे १००० ते  १४०० मतदार आहेत. मतदान केंद्रावर आल्यानंतर मतदान केंद्र शोधताना मतदारांचा गोंधळ होऊ नये, मतदान केंद्र शोधणे सुलभ व्हावे, गर्दी टाळावी यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मुंबई शहर जिल्हा निवडणूक कार्यालयातर्फे मतदारांसाठी रंग संकेतन मतदान केंद्र तयार केली जात आहेत.

मुंबई शहर जिल्ह्यातील विधानसभा मंतदारसंघांमधील विविध मतदान केंद्रात दिव्यांग, ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व मतदारांकरिता सहाय्यता कक्ष, महिलांसाठी हिरकणी कक्ष उभारण्यात येणार आहे. मतदारांचे मतदान असलेले मतदान केंद्र, गुगल मॅपनुसार मतदान केंद्राचा नकाशा, मतदान केंद्राचा रंग संकेतन, मतदान केंद्र असलेल्या विभागाचा रंग, याबाबतची माहिती मतदार माहिती चिठ्ठयांसह मतदारांपर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत पोहोचविण्यात आली आहे. मतदान केंद्रांवर मतदारांना रंग संकेतन व अनुक्रमांकाचे टोकनही दिले जाणार आहे. त्यानुसार हे टोकन घेतल्यानंतर मतदारांना रांगेत प्रतीक्षा कक्षात बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. रांगेतील क्रमांकानुसार मतदारांना मतदानासाठी त्या त्या रंग संकेतन मतदान केंद्रात सोडले जाणार असल्याचे मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव यांनी सांगितले.

०००







Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here