ग्रामीण भागासह शहरी भागातील मतदान जागृतीसाठी विविध उपक्रमांवर भर – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर – महासंवाद

ग्रामीण भागासह शहरी भागातील मतदान जागृतीसाठी विविध उपक्रमांवर भर – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर – महासंवाद




नागपूर,दि.7 :  ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात वास्तव्यास असलेल्या मतदारांचे प्रमाण अधिक आहे. ग्रामीण भागातील मतदान शहरी भागापेक्षा अधिक दिसून येते. प्रत्येक मतदाराला मतदान करण्याचा हक्क आपल्या राज्यघटनेने बहाल केला आहे. प्रत्येक मतदाराचे मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. हे कर्तव्य पार पाडण्यासाठी नागपूर येथून नोकरीनिमित्त बाहेर स्थलांतरीत झालेले मतदार मोठ्या संख्येने आपल्या मतदानाचे कर्तव्य बजावतील, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केला.

मतदान जनजागृतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर, महिला व बाल विकास विभागाच्या उपायुक्त डॉ. अपर्णा कोल्हे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास घोडके, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मतदारांना अधिक सोयीचे व्हावे, आपल्या बुथबाबत त्यांना माहिती कळावी यासाठी बीएलओ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यावर अधिकृत जबाबदारी सोपविण्यात आली आहे. बीएलओ हे घरोघरी मतदान चिठ्ठी पोहोचविणार आहेत. निवडणूक विभाग मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत असून या प्रयत्नांना मतदारांनी मतदान करुन मोलाचे सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.

सोशल इन्फ्ल्युएंसर मतदान जनजागृतीसाठी सरसावले

विविध समाज माध्यमांद्वारे सोशल मीडियावर सातत्याने कार्यमग्न असणाऱ्या सोशल इन्फ्ल्युएंसर यांची संख्या नागपूर मध्ये अधिक आहे. अनेक चांगल्या प्रकारच्या रिल्स, मिम्स, पोस्ट आपल्यामार्फत समाजापर्यंत पोहोचल्या आहेत. मतदान जागृती लोकशाहीच्या सक्षमतेसाठी आवश्यक असून आपण मतदार साक्षरतेसाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी केले. नागपूर महानगरातील व ग्रामीण भागातील सोशल इन्फ्ल्युएंसर यांच्या बैठकीत ते बोलत होते. या आवाहनाला तत्काळ प्रतिसाद देत आम्ही ही जनजागृती राष्ट्रीय कर्तव्याचा भाग म्हणून जबाबदारीने पार पाडू, असे सर्वांनी सांगितले.







Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here