उत्पादन शुल्क विभागाचे अद्ययावत प्रशिक्षण केंद्र उभारण्याची कार्यवाही गतीने करावी – मंत्री शंभूराज देसाई

उत्पादन शुल्क विभागाचे अद्ययावत प्रशिक्षण केंद्र उभारण्याची कार्यवाही गतीने करावी – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि. 10 : राज्यात उत्पादन शुल्क विभागासाठी स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र नव्हते. विभागामध्ये प्रशिक्षणासाठी अशाप्रकारे कुठेही सुविधा नाहीत. त्यामुळे विभागात प्रशिक्षणावर मर्यादा येत आहेत. प्रशिक्षणाअभावी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या क्षमता बांधणीवरसुद्धा परिणाम होतो. विभागांतर्गत प्रशिक्षण केंद्राची निकड लक्षात घेत वाटोळे, (ता. पाटण, जि. सातारा) येथे उत्पादन शुल्क विभागाचे पहिले प्रशिक्षण केंद्र उभारण्याची कार्यवाही गतीने पूर्ण करण्याचे निर्देश उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. तसेच प्रशिक्षण केंद्र हे अद्ययावत व सर्व सुविधांनीयुक्त करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

मंत्रालयात त्यांच्या दालनामध्ये प्रशिक्षण केंद्राबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला उत्पादन शुल्क विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आयुक्त विजय सूर्यवंशी, कोल्हापूर विभागाचे उपायुक्त श्री. चिंचाळकर, उपसचिव रवींद्र औटी, अवर सचिव संदीप ढाकणे आदी  उपस्थित होते, तर दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र ड्रुडी सहभागी झाले होते.

वाटोळे येथील जागा ताब्यात घेऊन इमारतीचा आराखडा तयार करण्याच्या सूचना देत उत्पादन शुल्क मंत्री श्री. देसाई म्हणाले की, जिल्हा प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून जमिनीचा ताबा उत्पादन शुल्क विभागाला द्यावा.  या प्रशिक्षण केंद्रामध्ये एकावेळी 200 अधिकारी प्रशिक्षण घेतील एवढी क्षमता आवश्यक आहे. प्रशिक्षण केंद्रात 30 लोकांसाठी निवासाची व्यवस्था असावी. प्रशिक्षणार्थी महिला अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी 75 क्षमतेचे व 150 पुरुष अधिकारी, कर्मचारी यांच्याकरीता वसतिगृह असावे. तसेच ग्रंथालय, तांत्रिक प्रयोगशाळा, संगणक कक्ष असावे.

प्रशिक्षण केंद्रात स्वतंत्र सेमिनार सभागृहाची व्यवस्था असणे आवश्‍यक असून वैद्यकीय तपासणी कक्ष, भोजनाच्या व्यवस्थेसह सुसज्ज असावे. यासोबतच  या ठिकाणी क्रीडाविषयक सर्व सुविधा करण्यात याव्यात, अशा सूचनाही मंत्री श्री. देसाई यांनी दिल्या. याकामाचे अंदाजपत्रक तातडीने तयार करुन आराखडे अंतिम करावेत.

यावेळी पाटण येथील प्रशासकीय इमारतीच्या कामाचाही आढावा घेण्यात आला. उर्वरित काम पूर्ण करण्याच्या सूचनाही मंत्री महोदयांनी दिल्या. बैठकीला संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

****

नीलेश तायडे/विसंअ/

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here