तंदुरूस्तीसाठी दैनंदिन आहारात पौष्टिक तृणधान्ये गरजेची – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

तंदुरूस्तीसाठी दैनंदिन आहारात पौष्टिक तृणधान्ये गरजेची – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली, दि. 29 (जिमाका) : शारीरिक तंदुरूस्ती व आरोग्य राखण्यासाठी दैनंदिन आहारात पौष्टिक तृणधान्यांचा समावेश करावा, असे आवाहन कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे केले.

जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. ॲग्री मॉल परिसर (फळरोपवाटिका कुपवाड प्रक्षेत्र), विजयनगर सांगली येथे आयोजित महोत्सवाच्या उद्‌घाटनप्रसंगी पालकमंत्री बोलत होते. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार, कृषी उपसंचालक प्रियांका भोसले, प्रकल्प संचालक (आत्मा) जांबुवंत घोडके, उपविभागीय कृषी अधिकारी जत मनोज वेताळ, उपविभागीय कृषी अधिकारी  विटा प्रकाश कुंभार, उपविभागीय कृषी अधिकारी मिरज रमाकांत भजनावळे, प्रकल्प उपसंचालक श्री. खरात, सर्व तालुका कृषी अधिकारी यांच्यासह क्षेत्रिय स्तरावरील अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी नागरिक उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले की, भारत जगातील सर्वात मोठा पौष्टिक तृणधान्य उत्पादक देश आहे. बदलत्या व धकाधकीच्या जीवनात तंदुरूस्त राहण्यासाठी तृणधान्यांचा उपयोग होतो. ज्वारी, बाजरी, नाचणी, राजगिरा अशा तृणधान्यांचा आपल्या आहारातील समावेश वाढविणे आवश्यक आहे. तृणधान्यांचे सेवन केल्याने शारीरिक व मानसिक तंदुरूस्ती मिळते, रोग प्रतिकारक शक्ती वाढते. तसेच, तृणधान्यांवर प्रक्रिया करून युवा पिढीला आवडतील असे विविध पदार्थ केले जात आहेत. त्यामुळे सशक्त पिढीसाठी व मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी दैनंदिन आहारात तृणधान्यांच्या पदार्थांचा समावेश करण्याची गरज करून त्यांनी याबाबत जनजागृती करण्याचे आवाहन केले.

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 च्या अनुषंगाने राष्ट्रीय कृषी विकास योजना सन 2023-24 महाराष्ट्र पौष्टिक तृणधान्य अभियानांतर्गत हा एकदिवसीय जिल्हास्तरीय कृषी महोत्सव घेण्यात आला. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय व उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय मिरज यांच्या समन्वयाने याचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवामध्ये पौष्टिक तृणधान्य पिकांची ओळख, आहारातील महत्त्व याबाबत प्रचार प्रसिद्धी, व्याख्यान, विविध नमुने, विविध पदार्थांचे 35 स्टॉलचा समावेश आहे. यामध्ये प्रक्रिया केलेले पदार्थ व प्रक्रिया संयत्र स्टॉलचा समावेश आहे.

पौष्टिक तृणधान्य रॅली

दरम्यान, कृषी महोत्सवाच्या उद्घाटनापूर्वी सकाळी कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शालेय  विद्यार्थी, शेतकरी व नागरिक यांच्या समवेत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 च्या अनुषंगाने विलिंग्डन कॉलेज ते विजयनगर चौक मार्गे ॲग्री मॉल परिसर अशी रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार, कृषी उपसंचालक प्रियांका भोसले, तालुका कृषी अधिकारी, कृषी विभागाचे कर्मचारी, चिंतामणराव व्यापार महाविद्यालय सांगली व राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषि व्यवसाय व्यवस्थापन व्यवस्थापन महाविद्यालय सांगली  महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी झाले होते.

या महोत्सवास शेतकरी, शेतकरी गट, महिला बचत गट व स्थानिक नागरिक यांनी भेट देवून उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

०००

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here