साने गुरूजींच्या कर्मभूमीतील साहित्य संमेलनाला सर्वतोपरी पाठबळ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

साने गुरूजींच्या कर्मभूमीतील साहित्य संमेलनाला सर्वतोपरी पाठबळ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 27 : – पूज्य साने गुरूजी यांचे हे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष आहे. या औचित्याने त्यांची कर्मभूमी असलेल्या अमळनेरमध्ये 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे, याचा आनंद आहे. हे संमेलन खान्देशच्या साहित्यिक वैभवात भर घालणारे ठरेल असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संमेलनाला सर्वोतोपरी पाठबळ दिले जाईल, असे आश्वस्त देखील केले.

या आगामी संमेलनासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे, कार्याध्यक्षा प्रा.डॉ. उज्ज्वला मेहंदळे व संमेलनाचे समन्वयक प्रा.डॉ.नरेंद्र पाठक यांनी वर्षा शासकीय निवासस्थानी भेट घेवून निमंत्रण दिले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, ‘साने गुरुजींच्या कर्मभूमीत मराठी साहित्य संमेलन होत आहे, ही केवळ खान्देशसाठी नव्हे तर महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. या संमेलनातील विचार मंथनातून राज्यातील साहित्यिक चळवळीला दिशा मिळेल. ज्यातून राज्याच्या हिताच्या उपक्रमांनाही चालना देता येईल, असा विश्वास देखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. खान्देशला मोठी साहित्यिक परंपरा राहिली आहे. यामुळे हे संमलन निश्चितपणे यशस्वी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी संमेलनाच्या तयारीची सविस्तर माहिती घेतली. संमेलनासाठी शासनातर्फे सर्वोतोपरी पाठबळ दिले जाईल, असे सांगत त्यांनी संमेलनाच्या निमंत्रणाचा स्वीकार केला.

0000

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here