धेरंड-शहापूर येथील प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना वाढीव मोबदला देण्यासाठी प्रयत्नशील-पालकमंत्री उदय सामंत

धेरंड-शहापूर येथील प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना वाढीव मोबदला देण्यासाठी प्रयत्नशील-पालकमंत्री उदय सामंत

रायगड,दि. १६(जिमाका):अलिबाग तालुक्यातील धेरंड-शहापूर येथील एमआयडीसीच्या प्रकल्पासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमीन अधिग्रहीत करण्यात येणार आहेत, त्यांना वाढीव मोबदला देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित धेरंड-शहापूर भूसंपादनाबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार महेंद्र दळवी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदिप कांबळे, जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे आदिंसह विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.सामंत म्हणाले की, हा प्रकल्प पूर्ण झाला पाहिजे आणि येथील शेतकऱ्यांना वाढीव भाव मिळाला पाहिजे,ही भूमिका एमआयडीसीने घेतली आहे.  पहिला हा भाव रु.35 लाख होता, दुसरा भाव रु.50 लाख, तिसरा रु.60 लाख आता यामध्ये वाढ करुन तो रु.70 लाखापर्यंत नेला आहे. अजूनही यामध्ये कॅल्यूलेशन करुन काही वाढीव देता आले तर त्यासाठीही प्रयत्न केले जातील.  या प्रकल्पामुळे सहा गावे प्रकल्पबाधित होणार आहेत. या प्रकल्पाबाधित सहा गावांच्या नागरी सुविधांसाठी रु.5 कोटीचा प्रस्ताव शेतकऱ्यांना दिले आहे. प्रकल्पबाधितांना नोकरी, प्रकल्पबाधितांना दाखला आणि भूखंड वाटप अविकसित असेल तर 15 टक्के, विकसित असेल 10 टक्केचे प्रस्ताव एमआयडीने शेतकऱ्यांना दिला आहे.  पुढील 15 दिवसांच्या आत  याबाबत पुढील बैठक घेण्यात येईल.

सर्वांनी प्रकल्प आणण्यासाठी दुजोरा दिला असून सर्व शेतकरी सकारात्मक आहेत,ही आनंदाची बाब असून सगळयांचे अभिनंदन  करतो.  शेतकऱ्यांची मागणी काय आहे, शेतकऱ्यांना समाधानी कसे करता येईल यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचेही पालकमंत्री श्री.सामंत यांनी सांगितले.

०००

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here