राज्यातील कुठलीही शाळा बंद होणार नाही – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
नागपूर, दि.14 : राज्यातील कुठलीही शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला नाही. चांगल्या शैक्षणिक सुविधांसाठी समूह शाळा धोरण ठरविले असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत दिली.
राज्यातील कमी पटसंख्या असलेल्या शाळांचे समूह शाळांमध्ये रूपांतरण करण्याच्या प्रस्तावाबाबत सदस्य अभिजित वंजारी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी मंत्री श्री. केसरकर बोलत होते. या चर्चेत सदस्य आमश्या पाडवी यांनी सहभाग घेतला.
मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, राज्यातील कुठल्याही मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवणार नाही. त्यांच्यासाठी जास्तीत जास्त चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना वीज, पाणी यांसह विविध शैक्षणिक सुविधांसाठी संबंधित विभागांची बैठक घेऊन त्या देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
000000
दत्तात्रय कोकरे/विसंअ/
——————————————————————————-
सखी सावित्री समितीची स्थापना न करणाऱ्या शाळांवर कारवाई- शिक्षणमंत्री दीपक केसरकर
नागपूर, दि.१४ : राज्यात बहुतांश शाळांमध्ये सखी सावित्री समितीची स्थापना करण्यात आली आहे. अद्यापही ज्या शाळा सखी सावित्री समितीची स्थापना करणार नाहीत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत दिली.
मुंबईसह राज्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सखी सावित्री समितीची स्थापना करण्याबाबतचा प्रश्न सदस्य उमा खापरे यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी मंत्री श्री. केसरकर बोलत होते. यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य सतेज पाटील, प्रवीण दरेकर, श्रीमती मनीषा कायंदे यांनी सहभाग घेतला .
मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, प्राथमिक, शिक्षण संचालनालयाकडून शाळा, केंद्र, तालुका/ शहर स्तरावर सखी सावित्री समिती गठित करण्याबाबत 5 ऑक्टोबर 23 रोजीच्या पत्रान्वये निर्देश देण्यात आले आहेत. शाळा, केंद्र, तालुका / शहर स्तरावर सखी सावित्री समिती गठित करण्याची कार्यवाही सुरू आहे. परंतु अद्यापही ज्या शाळांनी सखी सावित्री समिती गठित केली नाही, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच तालुकास्तरीय सखी सावित्री समितीच्या बैठकीस स्थानिक लोकप्रतिनिधींना बोलविण्यात येणार आहे.
0000000
दत्तात्रय कोकरे/विसंअ
—————————————————————————
अनाथ, दिव्यांग, एचआयव्हीग्रस्त मुलींना शिधापत्रिकेसह सुविधा– अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ
नागपूर, दि.14 – राज्यातील अनाथ, दिव्यांग व एच.आय.व्ही.ग्रस्त मुलींना शिधापत्रिका व शिधावाटपाची सुविधा उपलब्ध करून देणार असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी विधानपरिषदेत दिली.
शिधापत्रिका व शिधावाटपाची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रश्न सदस्य श्रीकांत भारतीय यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी मंत्री श्री. भुजबळ बोलत होते. या चर्चेत सदस्य सतेज पाटील यांनी सहभाग घेतला.
मंत्री श्री. भुजबळ म्हणाले की, राज्यस्तरीय अनाथ सल्लागार समितीचे सदस्य आमदार श्रीकांत भारतीय यांनी 26 एप्रिल 2023 रोजीच्या पत्रान्वये 11 अनाथ, दिव्यांग व एच.आय.व्ही. ग्रस्त मुलींना शिधापत्रिका तसेच शिधावाटप उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती. याप्रकरणी चौकशी करण्यात आली असून पत्रात नमूद 11 मुलींचे निवासी पत्ते व संपर्क क्रमांक यांची माहितीच्या अनुषंगाने संबंधित मुलींचे निवासी पत्ते, संपर्क क्रमांक व शिधापत्रिका वितरित करण्यासाठी आवश्यक माहिती प्राप्त करून घेऊन त्यांना शिधापत्रिका देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.
शिधापत्रिका वितरित करणे ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. अनाथ, दिव्यांग व एच.आय.व्ही.ग्रस्त व इतर समाजघटकांना नियमानुसार प्रचलित पद्धतीने शिधापत्रिका वितरित करण्यात येतात. यासाठी वेळोवेळी क्षेत्रीय कार्यालयाकडून मोहिमेचे आयोजन करून शिधापत्रिका वितरित करून त्यावरील अनुज्ञेय लाभ देण्यात येतात. तसेच अकरा मुलींच्या शिधापत्रिका देण्यास उशीर का झाला याची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही मंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.
00000
दत्तात्रय कोकरे/विसंअ/
—————————————————————————–
मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
नागपूर, दि. 14 : मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलाचे नूतनीकरण करून खेळांडूसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विद्यापीठामार्फत कार्यवाही प्रगतीपथावर असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानपरिषदेत दिली.
मुंबई विद्यापीठाच्या कलिना येथील क्रीडा संकुलाची दुरुस्ती करण्याबाबतचा प्रश्न सदस्य विलास पोतनीस यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी मंत्री श्री. पाटील बोलत होते. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य अनिकेत तटकरे, सुनील शिंदे यांनी सहभाग घेतला.
मंत्री श्री. पाटील म्हणाले की, क्रीडा संकुल दुरुस्तीसाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यादृष्टीने दुरुस्तीची कामे सुरू आहेत. क्रीडा संकुलातील जलतरण तलाव बंद केला जाणार नाही. यासाठी लागणारे आवश्यक पाणी सुध्दा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अन्य सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुंबईतील लोकप्रतिनिधींच्या सूचनाही विचारात घेऊन प्रत्यक्ष त्यांची क्रीडा संकुलात भेट आयोजित करण्यात येईल.
0000
दत्तात्रय कोकरे/विसंअ/